ठाण्यातील लोकमान्यनगर पाडा क्रमांक चारमध्ये वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर अंत्यदर्शन आणि अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या ७२ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. १३ एप्रिलला या रुग्णात करोनाची लक्षणे दिसून आल्याने त्याला तपासणीसाठी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात नेले होते. मात्र, त्यावेळी लक्षणे नसल्याचे सांगत त्यांना औषधे देऊन सोडून देण्यात आल्याचा दावा शेजाऱ्यांनी केला आहे.
ठाणे येथील लोकमान्यनगर भागातील एक व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. या रुग्णाच्या घरात पत्नी आणि लहान मुलगी असल्याने शेजारील काही नागरिक त्या व्यक्तीला १३ एप्रिलला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील करोना विभागात उपचारासाठी घेऊन गेले होते. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी या रुग्णाला करोना विषाणूचा संसर्गाची लागण झाली नसून केवळ रक्तदाब आणि शरीरातील साखरेचे प्रमाण वाढले असल्याचे सांगत औषधे देऊन सोडून दिले. रुग्णाला बरे वाटत नसल्याने शेजाऱ्यांनी १४ एप्रिल रोजी कोरस येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी कळवा रुग्णालयातील केसपेपर पाहून रुग्णाची केवळ औषधे बदलून त्याला घरी पाठवले. रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने शेजाऱ्यांनी त्याला परिसरातील खासगी दवाखान्यात नेले. तेथील डॉक्टरांनी करोना चाचणी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार १७ एप्रिल रोजी रुग्णाची खासगी प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यानंतर रुग्णाची प्रकृती खालावल्याने शेजाऱ्यांनी रुग्णाला पुन्हा कळवा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी रुग्णाला दाखल करुन घेतले, अशी माहिती रुग्णाच्या शेजाऱ्यांनी दिली. मात्र, डॉक्टरांनी रुग्णाची करोनाची कोणतीही चाचणी केली नाही. प्रकृती खालावल्याने या रुग्णाचा १८ एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यानंतर १९ एप्रिल रोजी हा रुग्ण करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले.
कळवा रुग्णालयात या व्यक्तिला आणण्यापूर्वी तो बेशुद्ध अवस्थेत होता. या रुग्णाची करोना चाचणी केल्याची माहिती नातेवाईकांनी लपवल्याचा दावा महापालिका प्रशासने केला आहे. मात्र, आम्ही सुरुवातीपासून कोणतीही माहिती लपवले नसल्याचे शेजाऱ्यांनी स्पष्ट केले. १३ तारखेलाच रुग्णाला डॉक्टरांनी करोना विभागात दाखल केले असते तर त्याचे प्राण वाचले असते, असा त्यांचा दावा आहे.
आणखी १७ जण विलगीकरण कक्षात
या रुग्णाच्या संपर्कातील आणखी १७ जणांना मंगळवारी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. सोमवारी ५५ आणि मंगळवारी आणखी १७ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आल्याने आता एकूण ७२ जणांची रवानगी विलगीकरण कक्षात झाल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दोन महिलांचा मृत्यू; बाळाला संसर्ग
ठाण्यात मंगळवारी करोनाच्या दोन रुग्णांचा मृत्य झाल्याची नोंद करण्यात आली. यामध्ये ७७ वर्षीय आणि ५८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात करोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा सहा झाला आहे. याशिवाय सात नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यात एका पाच महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण १५५ करोनाबाधित रुग्ण असल्याचे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. मंगळवारी आढळून आलेले सातही नवे रूग्ण कळवा, मुंब्रा, क्रांतीनगर, वागळे इस्टेट, घोडबंदर या भागातील आहेत.
