पेणच्या मूर्तिकारांना लॉकडाउनमधून वगळा

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील हजारो कुटुंबे घरोघरी गणेश मूर्ती घडवून उपजीविका करतात. या परिसराची अर्थव्यवस्थाच गणेश मूर्ती घडवण्याच्या पारंपरिक व्यवसायाशी निगडित आहे. त्यामुळे या मूर्तिकारांना लॉकडाउनमधून वगळण्याची मागणी आमदार रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक तसेच राज्याबाहेरूनही अनेक भाविक पेण परिसरातून गणेशमूर्ती खरेदी करून या मूर्तीची घरात प्रतिष्ठापना करतात. येथील हजारो कुटुंबांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन गणेश मूर्ती व्यवसायावर अवलंबून आहे. गणपती मूर्तींचे साचे घडवणे, मूर्ती घडवणे, रंगरंगोटी ही सर्व कामे ही हस्तकला असते. हाताने मूर्ती घडवायला वेळ जातो. मूर्तिकामास आत्ताच प्रारंभ न केल्यास गणेशोत्सवात मूर्तींची टंचाई भासू शकेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे गणेश मूर्ती कारखाने व घरोघरी मूर्ती बनविणाऱ्या कौटुंबिक मूर्तिकारांना लॉकडाउनमधून वगळण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती आमदार चव्हाण यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *