गेले काही दिवस बंद असलेला तुर्भे येथील फळ बाजार सोमवारी पुन्हा सुरू झाला असून हापूस आंब्याला चांगली मागणी आहे.
बाजारात फळांच्या एकूण १९४ वाहनांची नोंद झाली असून त्यातील अर्धी वाहने हापूस आंब्याची आहेत. पाच डझनांच्या एका पेटीला घाऊक बाजारात दीड ते तीन हजारांपर्यंत उठाव मिळाला आहे. त्यामुळे पुरवठा कमी असल्याने भाव चांगला मिळाल्याचे दिसून येते. कोकणात पडलेल्या अवकाळी पावसाने हापूस आंब्याचे थोडेफार नुकसान झाले आहे, मात्र पहिल्या मोसमातील हापूस आंबा काढून विकण्यास सुरुवात झाल्याने हे नुकसान कमी दिसून येत आहे.
कोकणातील हापूस आंब्यावर यंदा चोहोबाजूंनी संकट ओढवले आहे. गेल्या वर्षी लांबलेल्या पावसामुळे आंब्याला मोहर धरण्यास उशीर झाला. त्यानंतर थंडीनेही पाठ फिरवल्याने फळधारणा चांगली होऊ शकली नाही. त्यामुळे जानेवारी महिन्यात बाजारात येणारा हापूस आंब्याचा मोसम यंदा लांबणीवर पडला. त्यात मार्चपासून करोनाचे संकट ओढवल्याने हापूस आंब्याचे यंदाचे सर्व गणितच कोलमडून गेले आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या प्रयत्नाने काही सामाजिक संस्थांनी हापूस आंब्याची मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ व पुण्यात थेट गृहनिर्माण संस्थांच्या प्रवेशद्वाराजवळ विक्री सुरू करण्यात आली आहे.
त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात राज्य सरकारने सोमवारपासून काही अटी व शर्तीना अधीन राहून फळ बाजार सुरू केला आहे. सोमवारी फळ बाजारात झालेल्या आवकीत हापूस आंब्याची आवक जास्त असून त्याला उठावदेखील चांगला आहे. १९४ वाहनांमध्ये १०० वाहने ही केवळ कोकणातील हापूस आंब्याची होती.
पाच डझनाच्या एका पेटीला एक हजार ५०० पासून दर मिळू लागला आहे. त्यामुळे आवक कमी असली तरी भाव चांगला असल्याचे चित्र आहे.
