तांत्रिकाच्या सांगण्यावरुन बापानेच केली मुलीची हत्या, कारण ऐकून धक्का बसेल

उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरमध्ये तंत्र-मंत्राच्या नादात एका तरुणाने आपल्याच मुलीचा बळी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटना ककरौली भागामध्ये घडली आहे. या प्रकरणामध्ये मृत मुलीच्या आईनेच पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीच्या आधारावर चौकशी केली असता या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पिता खुर्शिद हा त्याची पत्नी रिहाना आणि पाच मुलांबरोबर ककरौली परिसरात राहत होता. मजदूर असणाऱ्या खुर्शिदचा रफीक नावाचा एक मित्र होता. रफीक मेरठमध्ये रहायचा. रिहानाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारच्या (१९ एप्रिल २०२०) मध्यरात्री रफीकने त्यांची सर्वात लहान मुलगी तरन्नूम हिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने तिचा गळा चिरल्याचे रिहानाने तक्रारीमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर खुर्शिदने आपल्या मुलीचा मृतदेह जमीनीमध्ये गाडला. या हत्याकांडाबद्दल समजताच रिहानाने सकाळीच पोलिसांकडे तक्रार केली.

पोलिसांनी तातडीने खुर्शिदला अटक केली. चौकशीदरम्यान खुर्शिदने कायम त्याच्यामध्ये आणि पत्नीमध्ये वाद होत असल्याचे पोलिसांना सांगितले. “मी तरन्नूमला इकडे ये म्हणत जवळ बोलवल्यानंतरही ती माझ्याकडे येत नसे. या गोष्टीचा मला खूप राग येत असे,” असं खुर्शिदने पोलिसांनी सांगितलं. यासंदर्भात खुर्शिदने त्याचा मेरठमधील मित्र रफीक याच्याशी चर्चा केली. तंत्र-मंत्र आणि तांत्रिक विद्येचे ज्ञान असल्याचा दावा करणाऱ्या रफीकने तरन्नूमची हत्या करण्याचा सल्ला दिला. रफीकच्या सल्ल्यानुसार खुर्शिदने गळा दाबून तरन्नूमची हत्या केली त्यानंतर तिचा गळा चिरुन बळी दिला. मुलीचा बळी दिल्यास सर्वकाही ठिक होईल असं रफीकने खुर्शिदला सांगितलं होतं.

या प्रकरणामध्ये पोलिसांनी रफीकलाही अटक केली आहे. त्यानंतर खुर्शिदने सांगितलेल्या ठिकाणी पोलिसांना तरन्नूमचा मृतदेह सापडला. आता या प्रकरणात पोलीस अधिक चौकशी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *