टाळेबंदीत पुण्याला जाण्याची पैज अंगलट ; बार्शीत कारवाई

संचारबंदीच्या काळात कोणतेही गांभीर्य न पाळता अनेक बेजबाबदार महाभाग सार्वजनिक ठिकाणी विनाकारण मोकाट फिरताना आजही दिसून येतात. अशाच महाभागांपैकी दोघा तरुणांनी कायद्याची भीती न बाळगता दुचाकीने पुण्याला सफर करून माघारी परतण्याची पैज लावली. परंतु ही पैज त्यांच्या चांगलीच अंगलट आली. यात पकडले गेल्यानंतर त्या दोघांना पोलिसांनी ‘प्रसाद’ तर दिलाच, शिवाय एका शाळेत १४ दिवस सक्तीचे विलगीकरणात ठेवले. बार्शी तालुक्यातील नागोबाची वाडी येथे हा प्रकार घडला.

देशभर वाढलेला करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने टाळेबंदी, संचारबंदी व जिल्हाबंदीसारखे अनेक कठोर उपाययोजना अमलात आणल्या आहेत. परंतु त्याविषयी फारसे गांभीर्य न पाळता कायदा मोडून अनेक बेजबाबदार नागरिक सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरतात. तरुणांमध्ये तर टाळेबंदी काळात कायदा मोडून जीवघेण्या पैजा लावण्यापर्यंतची टूम निघाली आहे. बार्शी तालुक्यातील काही अतिउत्साही तरुणांनी गप्पांच्या ओघात टाळेबंदी असतानाही दुचाकीने पुण्यातील चाकणपर्यंत जाऊन परत येण्याची पैज लावली. या पैजेचा विडा दोघा तरुणांनी उचलला आणि दुचाकीने ते खरोखर पुण्याकडे रवाना झाले. आश्चर्य म्हणजे पुण्यापर्यंत हे दोघे तरूण विनासायास पोहोचले. तेथे पोहोचल्याचा पुरावा म्हणून व्हिडिओ चित्रफीत काढून मित्रांना पाठविण्यात आली. मात्र ही गोष्ट इकडे गावात समजताच गावकरी मंडळींनी, अशा पैजा करोना संसर्गाला स्वत:हून आमंत्रण देणाऱ्या ठरतील म्हणून त्याची माहिती पोलिसांना कळविली. योगायोगाने तिकडे पुण्यात शेवटी हे दोघे पोलिसांच्या हाती लागले. पैज लवण्याची बक्षिसी म्हणून त्यांना पोलिसांनी ‘महाप्रसाद’ दिला. नंतर त्यांना त्यांच्या मूळ गावी-नागोबाच्या वाडीत परत पाठविण्यात आले. गावी परतल्यानंतर बार्शी तालुका पोलिसांनी त्या दोघा तरुणांची प्रथम ग्रामीण रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी करून घेतली आणि नंतर ‘सरकारनामा’ फेम यथोचित ‘सत्कार’ केला. शेवटी त्यांना सक्तीने गावातील शाळेत १४ दिवस सक्तीने विलगीकरणात ठेवले आणि कायदेशीर कारवाईही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *