करोना व्हायरसच्या संसर्गावर जवळपास नियंत्रण मिळवण्यास चीनला यश मिळाले आहे. तीन हजाराहून अधिकजणांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला. करोनामुळे चीनमध्ये निर्बंध हटवण्यात येत असताना एक धक्कादायक खुलासा झाला आहे. करोनाच्या आजारातून निरोगी झालेल्या रुग्णांपैकी १० टक्के रुग्णांना पुन्हा करोनाची बाधा होत असल्याचे समोर आले आहे.
वुहान येथील डॉक्टरांनी इशारा देताना करोनामुक्त रुग्णाला पुन्हा संसर्ग होत असल्याचे सांगितले आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, वुहानमधील डॉक्टर आणि वैज्ञानिक यामुळे चक्रावले आहेत. करोना व्हायरसमुक्त झालेल्या रुग्णांपैकी १० टक्के रुग्णांना पुन्हा करोनाचा संसर्ग होत आहे. करोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये करोनाच्या विषाणूविरोधात रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली पाहिजे. मात्र, पुन्हा करोनाने आजारी होत असतील हा चिंतेचा विषय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
चीनचे शासकीय वृत्तमाध्यम सीसीटीव्हीसोबत संवाद साधताना वुहान येथील तोंगजी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, याच रुग्णालयात करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर या रुग्णालयात करोनावर मात केल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्या रुग्णांना करोना झाल्याचे समोर आले. याचे कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरू असून संबंधित रुग्णाचे कुटुंबीय, मित्र परिवाराची चौकशी करण्यात येत आहे.
