करोना व्हायरस’च्या वाढत्या फैलावामुळं लोक कमालीचे सावध झाले आहेत. सर्दी, खोकला आणि घसादुखी ही ‘करोना’ची लक्षणं सांगितली गेली असल्यामुळं यापैकी काहीही होताच लोकांनी त्यावरची औषधं घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं या आजारावर लागू पडणारे पॅरासिटामोल, क्लोरोक्वीन व अन्य औषधांची मागणी दुपटीनं वाढली आहे. कसलाही आजार नसलेले लोकही काळजीपोटी ही औषधं घेऊन ठेवू लागले आहेत.
‘करोना’च्या रुग्णामध्ये घशाची खवखव, वारंवार शिंक येणे, डोकेदुखी, खोकला, अंगदुखी अशी लक्षणं दिसतात. ही सर्वसाधारण लक्षणं आहेत. एरवीही अनेकांना हा त्रास जाणवत असतो. डॉक्टरांकडून अशा रुग्णांना आवश्यकतेनुसार पॅरासिटामोल, अॅजिथ्रोमायसिन अशी औषधं दिली जातात. त्यामुळं लोक मेडिकलमधून आधीच ही औषधं घेऊन ठेवू लागले आहेत. क्लोरोक्वीन हे औषध ‘करोना’च्या आजारावर लागू पडत असल्याची चर्चा सध्या देशभरात आहे. त्यामुळं हे औषध घेण्याकडंही काही लोकांचा कल आहे. डॉक्टरांच्या प्रीस्क्रिपशनशिवाय लोक ही औषधं मागत आहेत. त्यामुळं काही केमिस्टनी अशा पद्धतीनं औषधं देणं बंद केलं आहे.
दरम्यान, राज्यातील करोनाबाधितांचा आकडा ९७ वर गेला आहे. मुंबईत आतापर्यंत ४१, पुणे १६, पिंपरी-चिंचवड १२, नागपूर ४, यवतमाळ ४, कल्याण ४, नवी मुंबई ४, सांगली ४, नगर २ आणि पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी आणि साताऱ्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. तर, ‘करोना’मुळं आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.
