सलग दुसऱ्या दिवशीही काही भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बुधवारी रात्री अंबाजोगाई परिसर तर गाराने झोडपून काढला. रस्ते, मोकळ्या जागेत गारांचा खच पडल्याचे दिसून आले. मात्र, या पावसाने रब्बीच्या पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान केले. परळी तालुक्यातील मांडेखेल येथील शेतात वीज पडल्याने सुधाकर नागरगोजे यांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. करोनाचे सावट आणि दोन दिवसांपासून गारपिटीने नागरिकांमध्ये संसर्गाची भीती अधिकच गडद झाली आहे.
बीड जिल्ह्यत करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाने सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद करून नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये अशा सूचना दिल्याने सर्वत्र सामसुमीचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. यातच १७ मार्चपासून सलग दोन दिवस रात्रीच्या वेळी अनेक भागात विजेच्या गडगडाटांसह गारांच्या पावसाने झोडपून काढले आहे. बुधवारी रात्री अंबाजोगाई, केज, धारुर या परिसरात गारांचा पाऊस झाल्याने रस्त्यावर आणि मोकळ्या जागांमध्ये घरांसमोर गारांचे खच पडले. या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील काढणीला आलेली पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. गहू, हरभरा आणि मोसंबी व डाळिंब बागांचे अतोनात नुकसान झाले. खरीप पिकाच्या काढणीच्या वेळेसही पावसाने झोडपल्याने मोठे नुकसान झालेले असतानाच रब्बीच्या काढणीच्या वेळीही नुकसानीचीच पुनरावृत्ती झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात आला आहे. परळी तालुक्यातील मांडेखेल येथे शेतामध्ये वीज पडल्याने सुधाकर नागरगोजे(वय ३८) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून नागनाथ नागरगोजे या सोळा वर्षीय मुलासह अन्य चार महिलाही किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मृत आणि जखमींना भरीव आíथक मदत देण्याची सूचना केली आहे. गारपीट, वीज पडून दगावलेली माणसे, जनावरे यांचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेशही मंत्री मुंडे यांनी दिले आहेत
