करोना विषाणूच्या भीतीमुळे राज्यभरातील धार्मिक पर्यटन स्थळे गेल्या काही दिवसांपासून हळूहळू ओस पडू लागली आहेत. पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर आदी धार्मिक पर्यटनस्थळांकडे भाविकांनी पाठ फिरविली असून शिर्डी तसेच इतर महत्त्वाच्या धार्मिक क्षेत्रांमधील उलाढाल घटल्याचे समोर आले आहे. दक्षिण भारत तसेच उत्तरेकडून या स्थळांवर येणाऱ्या अनेक पर्यटक भाविकांनी आपली हॉटेल तसेच वाहतुकीची आरक्षणे रद्द केली आहेत.
अक्कलकोट येथे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी दररोज १५ हजार भाविकांची गर्दी होते. परंतु करोना विषाणूच्या भीतीमुळे भाविकांच्या गर्दीत लक्षणीय घट झाली आहे. एरव्ही, दर गुरुवारी, दर पौर्णिमेला वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे पाय ठेवायलादेखील जागा नसते. त्यामुळे अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन होते. परंतु गुरुवारी मंदिरात भाविकांची गर्दी अजिबात दिसली नाही. अक्कलकोटच्या पुढे कर्नाटकात गाणगापूर येथे दत्तात्रेय देवस्थानातही भाविकांची संख्या रोडावल्यामुळे त्याचा फटका तेथील व्यावसायिकांना बसला आहे. सोलापूरपासून जवळच असलेल्या तुळजापूर येथेही अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
प्रवासी वाहतूक व्यवसाय अडचणीत
करोना विषाणूचा फैलाव होण्याच्या भीतीमुळे सोलापूर व परिसरातील धार्मिक पर्यटनस्थळां मध्ये भाविकांची वर्दळ घटल्यामुळे त्याचा फटका प्रवासी वाहतूक व्यवसायाला बसला आहे. देवदर्शनासाठी मुंबई, पुणे, ठाणे, कोकणातून दररोज हजारो भाविक पर्यटक सोलापुरात येतात. येथे आल्यानंतर पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर आदी ठिकाणी देवदर्शनासाठी जाण्यासाठी खासगी प्रवासी वाहतुकीची मोटारी भाडय़ाने घेतली जातात. त्यातून प्रवासी वाहतुकीत मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. परंतु आता करोना विषाणूच्या भीतीपोटी भाविकांनीच पाठ फिरविल्यामुळे प्रवासी वाहतूक व्यवसाय अडचणीत सापडला आहे.
विठ्ठलाच्या दारी भाविकच नाही..
महाराष्ट्राचे आराध्यदैवत विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज सर्वसाधारणपणे २५ ते ३० हजार भाविक पंढरपुरात येतात. पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत विठ्ठल मंदिरात व संपूर्ण परिसरात भाविकांची मोठी वर्दळ असते. दररोज लाखोंची आर्थिक उलाढाल होते. परंतु करोना विषाणूच्या भीतीमुळे आता राज्यभरातील भाविकांनी देवदर्शनाकडे पाठ फिरविली आहे. दररोजच्या तुलनेत ७० टक्क्य़ांपर्यंत भाविकांची गर्दी ओसरली आहे. दर्शनबारी रिकामी असून भाविकांना थेट मंदिरात दर्शनासाठी विनासायास जाता येत आहे.
