कन्नड भाषेतील प्रसिद्ध कवी कुप्पळ्ळी वेंकटप्पा पुट्टप्पा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा यावर्षीचा प्रतिष्ठेचा कुवेंपु राष्ट्रीय पुरस्कार मराठीतील ज्येष्ठ कादंबरीकार श्याम मनोहर यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम पाच लाख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दिवंगत कवी कुवेंपु यांच्या कर्नाटकमधील कुप्पळ्ळी या जन्मगावी २९ डिसेंबर रोजी, त्यांच्या जन्मदिनी हा पुरस्कार मनोहर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
कुवेंपु प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक हंपा नागराज यांनी मुंबईतील कर्नाटक संघ येथे ही माहिती दिली. मनोहर यांनी साहित्यक्षेत्रात आजवर दिलेल्या योगदानामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे नागराज यांनी सांगितले. श्याम मनोहर यांनी आठ लघुकथा, आठ नाटकं व इतर अनेक विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्या, पुस्तके महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये अभ्यासासाठी सुचविण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या अनेक लघुकथा व कादंबऱ्यांचे गुजराती, उर्दू, हिंदी, सिंधी, कन्नड आणि इंग्रजी यासारख्या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. मनोहर यांचा जन्म १९४१ मध्ये झाला असून ते पुण्यातील एस. पी. महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत. या पुरस्कारासाठी कोंकणी, मराठी व गुजराती लेखकांची नावे चर्चेत होती.
साहित्यातील योगदान..
लघुलेखन- बिनमौजेच्या गोष्टी, आणि बाकीचे सगळे, दोन्ही.
कादंबरी- हे ईश्वरराव..हे पुरुषोत्तमराव, शीतयुद्ध सदानंद, कळ, खूप लोक आहेत, खेकसत म्हणणे आय लव्ह यू, उत्सुकतेने मी झोपलो, शंभर मी, प्रेम आणि खूप खूप नंतर.
मिळालेले पुरस्कार..
कराड पुरस्कार (१९८२), दिवंगत ह. न. आपटे पुरस्कार (१९८३), नाटय़दर्पन पुरस्कार (१९८६), राम गणेश गडकरी महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९९८), साहित्य अकादमी पुरस्कार (२००८) व इतर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
कादंबरीकार श्याम मनोहर यांना कुवेंपु राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

