सर्वोच्च न्यायालय बाँबने उडवण्यात येणार असल्याची धमकी एका अज्ञात व्यक्तीने ईमेलद्वारे दिल्याचे समोर आले असून त्या पार्श्वभूमीवर न्यायालयात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी हा धमकीचा मेल मिळाला असून न्यायालयाची इमारत बाँबने उडवून देऊ असे त्यात म्हटले आहे. ही मेल नक्की कुठून आली याचा तपास सुरू असून मेलची सत्यताही पडताळून पाहण्यात येत आहे. दरम्यान या मेलच्या पार्श्वभूमीवर सर्व लॉ इंटर्न्सना एक महिन्यासाठी कोर्टात येण्यास मनाई करण्यात आली असून कोर्टाच्या आवारात येणा-या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी करण्यात येत आहे.
१९९३ सालच्या बाँबस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमनला गेल्या महिन्यात फासावर चढवण्यात आल्यानंतर त्याचा दयेचा अर्ज फेटाळत त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करणारे न्या. दीपक मिश्रा यांनाही धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर दजीपक मिश्रांसह याकूबच्या फाशीवर शिक्कामोर्तब करणा-या इतर तीन वकिलांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

