भाड्याच्या घरापासून आलिशान बंगल्यापर्यंत पाहा बॉलिवूड गायिकेचा प्रवास

स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. आपल्या कमाईच्या बळावर कुटुंबासाठी किमान एकतरी घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. परिस्थिती आणि मनात असणारी ही इच्छा यांच्याच बळावर मग प्रयत्न सुरु होतात ते म्हणजे ही इच्छा पूर्ण करण्याचे.

कलाविश्वात सध्या आघाडीच्या गायिकांपैकी एक असणाऱ्या नेहा कक्कर हिनेही अशीच कित्येक स्वप्न पाहिली होती. अतिशय आव्हानात्नक परिस्थितीचा सामना करुन नेहा आज यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. पण, इथे असतानाही तिने आपल्या परिस्तिथीचा विसर स्वत:ला पडू दिलेला नाही. नेहानेच केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमधून हे पाहता येत आहे. आपल्या नव्या आणि जुन्या घराचा फोटो तिने पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने तितकंच भावनिक कॅप्शन लिहित भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. ‘हा ऋषीकेशमधी आमचा आताचा बंगला आहे’, असं म्हणत तिने याच पोस्टमध्ये आणखी एक फोटोही शेअर केला आहे. त्याविषयी तिने लिहिलं, ‘हे तेच घर आहे जिथे माझा जन्म झाला होता. या एकाच खोलीच्या घरात आम्ही सर्व कक्कर राहत होतो. जिथे माझ्या आईने एक टेबल लावला होता. त्या लहानशी घरात तेच आमचं स्वयंपाकघर होतं. ते घरंही आमचं स्वत:चं नव्हतं. त्यासाठी आम्ही भाडं भरत होतो. आता याच शहरात जेव्हा जेव्हा मी आमचा स्वत:चा बंगला पाहते तेव्हा तेव्हा मी प्रत्येक वेळी भावनिक होते.’

रिऍलिटी शोची स्पर्धक म्हणून आलेली नेहा पाहता पाहता या कलाविश्वात स्थिरावली आणि तिने रिऍलिटी शोच्या परीक्षकपदाचीही धुरा सांभाळली. हेवा वाटावा असाच तिचा हा प्रवास. यशाच्या या टप्प्यावर तिने कायमच आपल्या कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. कारकिर्दीत अतिशय दमदार कामगिरी करणाऱ्या या गायिकेला संघर्ष आणि त्यानंतरचं हे जीवन पाहता चाहत्यांच्या मनातही तिच्याप्रती प्रेम आणि आदराची भावना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *