जगभरात सध्या थैमान घालत असलेला करोना व्हायरस आता भारतात देखील पसरत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारसह देशभरातील विविध राज्यांच्या सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. दिल्ली सरकारकडून शासकीय कार्यालयांमधील बायोमेट्रिक हजेरी तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचारी हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करणार आहेत.
बायोमेट्रिक हजेरीत डोळे किंवा हाताच्या बोटांचा वापर केला जातो. त्यामुळे एकाच मशीनला अनेकजणांचा स्पर्श होत असतो. यामुळे प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याचे पाहून मुख्यमंत्री केजरीवाल सरकारने तात्पुरत्या स्वरुपासाठी बायोमेट्रिक हजेरी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
३१ मार्च पर्यंत प्राथमिक शाळा देखील बंद –
दिल्ली सरकारने मुलांचा ‘COVID-19’ पासून बचाव होण्याच्या दृष्टीने ३१ मार्च पर्यंत सर्व प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने देखील करोना व्हायरसचा धोका लक्षात घेता इयत्ता दहावी व बारावीची बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना परीक्षा केंद्रावर मास्क घालून येण्यास परवानगी दिली आहे.
