पुलवामा घटनेत बुलढाणा जिल्हय़ातील दोन शहिदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून ही मदत देण्यात येत आहे. उर्वरित ४० लाखांच्या मदतीचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येईल.
पुलवामा हल्ल्याला वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने ‘पुलवामातील हौतात्म्याचा सरकार आणि संस्थांना विसर’ या मथळय़ाखाली ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या माध्यमातून शहिदांच्या कुटुंबीयांची व्यथा मांडण्यात आली होती. याची सत्ताधारी व प्रशासनाकडून दखल घेत मदतीच्या दृष्टीने तात्काळ हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. अखेर २ मार्चला शासन निर्णय काढून दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी १० लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने १४ फेब्रुवारी २०१९ रोजी केलेल्या आत्मघातकी हल्लय़ात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्हय़ातील मलकापूर येथील संजयसिंह भिकमसिंह राजपूत (४५) व लोणार तालुक्यातील चोरपांग्रामधील नितीन शिवाजी राठोड (३७) या दोन जवानांना वीरमरण आले. घटनेच्या वर्षपूर्तीनंतरही शहीद जवानांच्या कुटुंबीयांना शासनाने जाहीर केलेल्या पाच एकर जमिनीसह आर्थिक मदतीची प्रतीक्षा लागली होती.
