नवीन मिठाच्या विक्रीला विलंब

यंदा लांबलेल्या पावसाळ्यामुळे नवीन मीठ उत्पादन होण्याचा कालावधी सुमारे महिनाभराने पुढे ढकलला गेला. दरवर्षी जानेवारी महिन्यात मीठ विक्रीला सुरुवात होते. मात्र यंदा फेब्रुवारीच्या अखेरीस मीठ विक्रीला सुरुवात झाली आहे. नवीन मिठाच्या विक्रीस अनेक ठिकाणी प्रारंभ करण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात मीठ उत्पादनावर परिणाम होणार असून उत्पादकांचे दुहेरी नुकसान झाले आहे.

केळवे मीठ उत्पादक सहकारी सोसायटी लिमिटेड यांच्या संजीवनी मिठागरात नवीन मिठाच्या विक्रीचा प्रारंभ २४ फेब्रुवारी रोजी करण्यात आला. इतर वर्षी जानेवारीमध्ये नव्या मिठाचे उत्पादन झाल्यानंतर विक्री करण्यापूर्वी होणाऱ्या विधिवत पूजनाचा कार्यक्रम यंदा सुमारे महिनाभर लांबला.

पालघर तालुक्यात असलेल्या सहकारी व खाजगी मीठ उत्पादकांकडून सुमारे ५० ते ६० हजार मेट्रिक टन इतके मीठ उत्पादन होत असून त्यापैकी आठ ते नऊ हजार मेट्रिक टन मिठाचे उत्पादन केळवे येथील संजीवनी मिठागर येथे होत असते. सध्या या मिठाला १८०० रुपये प्रति मेट्रिक टन इतका दर प्राप्त झाला असला, तरी आगामी काळात इतर मिठागरांमधून मिठाची विक्री सुरू झाल्यानंतर या दरामध्ये घसरण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

यंदाच्या हंगामात लांबलेल्या पावसामुळे गोडय़ा पाण्याचा प्रभाव उशिरापर्यंत राहिल्याने मीठ उत्पादन करण्यास विलंब झाला. तसेच पावसाचा हंगाम लांबल्याने साठवलेल्या मिठाची धूप अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून आले आहे. एकीकडे मिठागरांच्या व्यवसायात ऊर्जेचा खर्च वाढत चालला असताना मीठ उत्पादकांना दुहेरी नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे केळवे मीठ उत्पादक सहकारी सोसायटीचे चेअरमन जगदीश घरत यांनी सांगितले.

केळव्यातील मिठाला मुंबई, पुणे, भिवंडी, उल्हासनगर येथील व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी आहे. जिल्ह्यातील मीठ उत्पादकांना चांगला दर मिळावा म्हणून मीठ उत्पादन करणाऱ्या सहकारी संस्था आणि खासगी मंडळींनी पालघर, डहाणू तालुका मीठ उत्पादक असोसिएशनची स्थापना केली आहे. एकीकडे नवीन पिढी व तरुण या व्यवसायाकडे येण्यास उत्सुक नसल्याने मनुष्यबळाचे या व्यवसायाला संकट भेडसावत आहे. शासनदेखील मीठ उत्पादकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यास पुढाकार घेत नसल्याने या संपूर्ण व्यवसायाला धोका निर्माण झाला असून असेच सुरू राहिल्यास राज्यातील मीठ उत्पादन बंद करावे लागेल, अशी खंत जगदीश घरत यांनी व्यक्त केली.

सवलती द्याव्यात!
मीठ उत्पादक संस्थांना सध्या औद्योगिक प्रणालीमध्ये गणले जात असून त्या अनुषंगाने त्यांना वीज आकारणी करण्यात येते. नैसर्गिक पद्धतीने मिठाचे उत्पादन घेणे हे कृषी विभागाअंतर्गत व्यवसायामध्ये समाविष्ट करण्यात यावे, अशी या क्षेत्रातील जुनी मागणी अजूनही प्रलंबित आहे. मीठ उत्पादन हे मत्स्यव्यवसाय किंवा शेतीशी समांतर अशी प्रक्रिया असून शेतकऱ्यांना ज्या दराने कृषी पंपाकरिता वीज उपलब्ध करून दिली जाते, त्याच पद्धतीने सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून द्यावी, अशी या व्यावसायातील मंडळींची मागणी आहे. सध्या औद्योगिक वीजदराने केळवे येथील मिठागरात सुमारे १०० अश्वशक्ती क्षमतेच्या विजेची जोडणी असून वर्षांकाठी विजेचा खर्च दहा लाख रुपये इतका येत असल्याची माहिती घरत यांनी दिली.

तुलात्मक कमी उत्पादन
राजस्थान व गुजरात या दोन राज्यांत पावसाचा अवधी महाराष्ट्राच्या तुलनेत कमी असल्याने तसेच तेथील तापमान पालघर जिल्ह्यातील तापमानापेक्षा अधिक असते. शिवाय त्या ठिकाणी पाण्यातील खारटपणा तुलनात्मक अधिक असल्याने त्या दोन राज्यांत मिठाचे उत्पादन अधिक प्रमाणात होत असते. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी यांत्रिकीकरण झाल्यामुळे त्या राज्यातील मिठाच्या उत्पादनाचा दर तुलनात्मक कमी असल्याने राज्यातील मीठ उत्पादन संकटात आले आहे. दुसरीकडे मीठ उत्पादक संस्थांना त्यांच्याकडे असलेल्या जमिनीचे लीज वाढवून दिले जात नाही, मीठ उत्पादकांकडून जमिनीचे भाडे (धारा) स्वीकारला जात नाही, अशा अनेक समस्यांना येथील मीठ उत्पादक सामोरे जात आहेत.

पालघरच्या मिठाला पश्चिम महाराष्ट्रात मागणी
जिल्ह्यत उत्पादित होणारे मीठ हे इतर ठिकाणाहून उपलब्ध होणाऱ्या मिठापेक्षा अधिक शुभ्र व दाणेदार असल्याने या मिठाला पुणे, सांगली, सातारा व इतर भागात विशेष मागणी आहे. जिल्ह्यतील पश्चिम किनारपट्टीवरील मीठ व्यापारी विकत घेऊन भिवंडी व अन्य ठिकाणी त्याची साठवणूक करतात व नंतर मागणीप्रमाणे या मिठाचे पन्नास किलोच्या गोणीमध्ये त्याची भरणी करून विक्री केली जाते. जाडे मीठ हे औद्योगिक वापरासाठी उपयोगात येत असून त्याचे काही प्रमाणात दळून खाण्यामध्ये देखील वापर केला जातो असे सांगण्यात येते. पालघर परिसरात चांगल्या दर्जाचे मीठ उत्पादित होत असल्याने त्याला स्थानिक पातळीवर पॅकिंग करून विक्री करण्यासाठी जिल्ह्यतील महिला बचत गट पुढे आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *