लोअरपरळ येथे डंपरने तिघांना चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू

लोअरपरळ येथे बावला मस्जिद समोर सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या डंपरने तिघांना चिरडल्याने या अपघातात दोनजण जागीच ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची घटना समजताच स्थानिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली होती.

लोअरपरळ येथे ना. म. जोशी मार्गावरील बावला मशीदजवळील मोनोरेल स्टेशनच्या पुलाखाली सोमवारी रात्री ११.३० वाजता हा दुर्देवी अपघात घडला. दारुच्या नशेत असलेला डंपरचालक भरधाव वेगाने या पुलाखालून जात होता. यावेळी त्याचं डंपरवरील नियंत्रण सुटल्याने त्याने गाड्यांना धडक द्यायलाय सुरुवात केली. या डंपरच्या धडकेत एका टॅक्सीला नुकसान झाले असून एका कारचा चक्काचूर झाला आहे.

त्यानंतर हा डंपरचालकाने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता रस्त्यावरून चालणाऱ्या तिघा जणांना चिरडले. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एका जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला नायर रुग्णालयात दाखळ करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *