राज्यातील अष्टविनायकाच्या मंदिरांना जोडणार्या रस्त्यांची दुरुस्ती तसेच रुंदीकरण करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला असून एका वर्षात हे काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे एरवी दोन दिवसांच्या अष्टविनायक यात्रेसाठी आता एक दिवसच लागणार आहे. येत्या वर्षात अष्टविनायकाची मंदिरे, रस्तारुंदीकरण, दुरुस्तीकरण करण्याचे काम पूर्ण होणार असून त्यानंतर एका दिवसात अष्टविनायक यात्रा करणे सहजशक्य होणार आहे.
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी सध्या मोटारीने जायचे असेल तर ४८ तास लागतात. हा प्रवास निम्म्या वेळेत, जलद, सुलभ आणि टोलविना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाऊल उचलले आहे. अष्टविनायकांच्या मंदिरांना जोडणार्या ६६० किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण, दुरुस्ती, मजबुतीकरण यावर १८१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून मोरगाव ते सिद्धटेकदरम्यानच्या रस्त्यासाठी ५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ६६० किलोमीटर रस्त्याचे हे काम एक वर्षात पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांचा वेळ वाचेल आणि भाविक तसेच पर्यटकांचा ओघ वाढेल, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
अष्टविनायकाची यात्रा आता एका दिवसात

