आपल्या घरगुती कामासाठी बाहेरगावावरून गावाकडे ऑटोरिक्षाने येत असताना अज्ञात वाहनाने ऑटोला दिलेल्या धडकेत दीर, भावजयीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास जाहूर उंद्री या राज्यरस्त्यावर उंद्री गावानजीक घडली.
मुखेड तालुक्यातील उंद्री बागवान कुटुंबातील काही सदस्य घरगुती कामानिमित्त ऑटोद्वारे बाहेरगावी गेले होते. काम आटोपून परत आपल्या उंदरी गावाकडे येत असताना त्यांच्या एपीडब्ल्यू-९८१२ या ऑटोस अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या घटनेत जैतुनबी मोहसीन बागवान (वय ६०) ह्या जागीच ठार झाल्या, तर यादुल हैदरसाब बागवान (वय ३५) हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारार्थ नांदेड येथे घेऊन जात असताना वाटेतच बागवान यादुल यांचा मृत्यू झाला.
