लाचखोर वनरक्षकाला अटक

रानडुकराच्या हल्लय़ात जखमी झालेल्या पत्नीला शासनाकडून मिळालेल्या मदतीची रक्कम मंजूर करून दिल्याचा मोबदला म्हणून एका शेतकऱ्याकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज शुक्रवारी नवेगाव (रै) बिटाचा वनरक्षक महेश नामदेव तलमले (४०) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून अटक केली.

तक्रारकर्ता हा दर्शनी (चक) येथील रहिवासी असून, शेतकरी  आहे. त्याच्या पत्नीला रानडुकराने हल्ला करून जखमी केले होते. यामुळे त्याला नियमानुसार एक लाख २५ हजार रुपयांची मदत शासनाने मंजूर केली. परंतु ही रक्कम आपण मंजूर करून दिली असून, त्याचा मोबदला म्हणून आपणास २५ हजार रुपये द्यावे, अशी मागणी वनरक्षक महेश तलमले याने केली. तक्रारकर्त्यांने त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज या विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारकर्त्यांच्या शेतशिवारात  सापळा रचला.

यावेळी वनरक्षक महेश नामदेव तलमले यास तक्रारकर्त्यांकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *