म्हातारपणी मुलांनी आई वडिलांचा आधार व्हायचं असतं. मात्र बुलडाण्यातील खामगावात मात्र ७५ वर्षांच्या वृद्ध आईला मुलांनी घरातून हाकलून दिलं आहे. शेतात काम कर आणि पैसे कमव असं तिला सांगत ७५ वर्षांच्या आईला मुलांनी घराबाहेर काढलं आहे.
मुलांनी घराबाहेर काढल्याने ७५ वर्षांच्या आईवर खामगावच्या सामान्य रुग्णालयाचा आसरा घेण्याची वेळ आली आहे. द्वारकाबाई महादेव पल्हाडे असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. द्वारकाबाई या त्यांची दोन मुलं, सून आणि नातवंडांसह पळशी बुद्रुक या ठिकाणी राहात होत्या.
मात्र काही दिवसांपूर्वी द्वारकाबाईंना त्यांची मुलं सहदेव आणि वासुदेव या दोघांनी घरातून हाकललं. द्वारकाबाईंच्या दोन्ही सुनांनी त्यांना शिवीगाळ केली आणि मारहाणही केली. द्वारकाबाईंनीच हा आरोप केला आहे. ही घटना घडल्यावर द्वारकाबाईंनी खामगाव येथील ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तिथे दोन मुलांच्या विरोधात तक्रार केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
या संदर्भातली तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता ” मला दोन मुलं आहेत, त्यांची नावं सहदेव आणि वासुदेव आहेत. तू शेतावर काम कर आणि आम्हाला पैसे कमवून आणून दे असं सांगत मला हाकलण्यात आलं” असं द्वारकाबाईंनी पोलिसांना सांगितलं.”वय झाल्याने माझ्याच्याने काम होत नाही असे मी त्यांना सांगितले. मात्र मला दोन्ही मुलांनी हाकलून दिलं” असंही द्वारकाबाईंनी सांगितलं.
द्वारकाबाईंकडे १२ एकर शेती आहे. ही जमीन त्यांची मुलंच कसतात. मात्र वृद्ध आईने शेतात काम करावं ही त्यांची अपेक्षा आहे. ही पूर्ण न झाल्याने जन्मदात्या आईलाच या मुलांनी हाकलून दिलं आहे.
पोलिसांनी या घटनेची नोंद करुन घेतली आणि मुलांना फोन करुन आईला घेऊन जा असे सांगितले होते. मात्र अद्याप द्वारकाबाईंना कुणीही न्यायला आलेलं नाही. त्यामुळे खामगाव येथील सामान्य रुग्णालयाचा आसरा त्यांनी घेतला आहे. कडाक्याच्या थंडीत द्वारकाबाईंना अशा पद्धतीने जगण्याची वेळ पोटच्या मुलांमुळेच आली आहे.
