भरदिवसा घरफोडी करणाऱ्या पाच जणांना अटक

शहरातील गंगापूर रोड येथील आनंद व्हिला बंगल्यात भरदिवसा घरफोडी करून ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या पाच चोरटय़ांना शहर पोलीस गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रोमेश लुथ्रा यांच्या घरातील कपाटात ठेवलेले ५१ लाख १५ हजार रुपयांचे दागिने आणि इतर साहित्य चोरण्यात आले होते. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लुथ्रा यांच्या घरातील चोरीचा तपास करतांना घरातील महिला कर्मचारी राधाबाई गायकवाड हिच्यावर पोलिसांनी लक्ष्य केंद्रित केले. तिची सखोल चौकशी केली असता तिने गुन्ह्य़ाची कबुली दिली. लुथ्रा यांना घरातील कपाटात दागदागिने, पैसे ठेवतांना पाहिले होते. ही माहिती तिने संशयित बालाजी घागरमळे (रा. इंदिरानगर), दत्ता भदर्गे (रा. राणेनगर) यांना दिली. त्यांनी एकत्रितरित्या दागिने चोरी करण्याचा कट रचला. २७ जानेवारी रोजी लुथ्रा घरात नसल्याचे महिलेने अन्य संशयितांना सांगितले. तिघांनी घरफोडी करत हे दागिने संशयित योगेश पाईकराव (रा. समतानगर), अभिषेक निकम (रा. भांडीबाजार) यांच्या मदतीने शहरातील सराफ व्यावसायिकास विक्री करून आलेले रोख रुपये आपआपसात वाटून घेतल्याची कबुली दिली.

पोलिसांनी गायकवाड, घागरमळे, भदर्गे, पाईकराव, निकम यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली असता घागरमळे याने घरफोडी केल्यानंतर त्यातील सोन्याचे दागिने, हिरे, बांगडय़ा काढून पासपोर्ट आणि अन्य कागदपत्रे इतरत्र फेकून दिल्याचे सांगितले. सोन्याचे दागिने, हिरे विकून २५ लाख ७५ हजार रुपये आले. ती रक्कम आपआपसात वाटून घेतली. पोलिंसांनी ही रक्कम हस्तगत केली असून संशयितांना मुद्देमालास सरकारवाडा पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *