एसी लोकलला शनिवार-रविवार सुट्टी

मोठा गाजावाजा करून ठाणे-वाशी मार्गावर सुरू होत असलेली वातानुकूलित लोकल शनिवार आणि रविवारी मात्र सुट्टी घेणार आहे. ठाणे-वाशी एसी लोकलच्या फेरीचे आज, गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता उद्घाटन होणार असून ठाण्यातील वाढत्या गर्दीमुळे उद्घाटनाचा कार्यक्रम पनवेलला हलवला आहे. या मार्गावर आधीच फेऱ्यांची कमतरता जाणवत असताना एसी लोकलमुळे नित्याच्या फेऱ्या आणखी कमी होणार आहेत. एसी लोकलच्या प्रतिसादाबद्दल साशंक असलेल्या रेल्वेने शनिवारी ही फेरी वातानूकूलितऐवजी साध्या गाडीची फेरी म्हणून चालवण्यात येणार आहे, तर रविवारी या गाडीची फेरीच रद्द करण्यात येणार आहे.

ठाणे-वाशी, पनवेल हा ट्रान्सहार्बर रेल्वेमार्ग अल्पावधीतच गर्दीने खच्चून वाहू लागला असून ठाण्याच्या दहाही प्लॅटफॉर्मवर दिवसभर प्रवाशांची भरपूर वर्दळ असते. मुंबईतील बोरीबंदर रेल्वे स्थानकातून पहिली रेल्वे गाडी ठाणे स्थानकात दाखल झाल्यानंतर भारतातील रेल्वे प्रवासाचा प्रारंभ झाला होता. त्यामुळेच मध्य रेल्वेमार्गावरील एसी लोकलचा उद्घाटन समारंभही ठाणे स्थानकातून व्हावा, अशी अपेक्षा होती. मात्र ठाणे स्थानकातील ट्रान्स हार्बरचे फलाट अत्यंत अरूंद आहेत. त्यात प्रवाशांची भर पडल्यानंतर तिथे उभे राहण्यासही जागा मिळत नाही. अशा अरूंद ठिकाणी कार्यक्रमाची आखणी केल्यास गर्दी हाताबाहेर जाण्याची भीती रेल्वे प्रशासनाला वाटत होती. प्रवाशांच्या रोषालाही सामोरे जावे लागले असते. त्यामुळेच ठाणे स्थानकाऐवजी पनवेल स्थानकातून ही लोकल सोडण्याचे निश्चित करण्यात आल्याचे समजते. लोकप्रतिनिधींनीही रेल्वेकडे ठाणे स्थानकाचा आग्रह धरला होता. परंतु जागा नसल्याचे कारण रेल्वेने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *