प्रवासी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात २० जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये हा अपघात झाला. कन्नौजमधील गुरसहायगंज येथून जयपूरला ही बस जात होती. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली असून जखमींना ५० हजार रूपये तर मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
ट्रक आणि बसच्या अपघातानांतर बसला आग लागली. दरम्यान, आगीची तीव्रता अधिक असल्यानं बसमधील प्रवाशांना बाहेर पडणं कठीण झालं होतं. त्यामुळे अनेक प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही. यामध्ये २० प्रवशांचा मृत्यू झाला. तर २१ जण जखमी झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या घटनेची दखल घेतली असून त्यांनी ट्वीट करून दु:ख व्यक्त केलं आहे. या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. मृतांच्या कुटुंबीयांप्रती दु:ख व्यक्त करतो आणि जखमी नागरिकांनी लवकर बरं होण्याची मी प्रार्थना करतो, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
“अपघातग्रस्त बसमधून एकूण ४३ प्रवासी प्रवास करत होते. यापैकी २६ प्रवासी गुरसहायगंज येथून तर १७ प्रवासी छिबरामऊ येथून प्रवास करत होते. या अपघातात २१ प्रवासी जखमी झाले आहे. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे,” अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र कुमार यांनी दिली.
