वसई विरार शहरात पुन्हा एकदा प्लास्टिकची अंडी विक्रीला आल्याच्या अफवा पसरू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विरार आणि नालासाोपारा मध्ये संतप्त नागरिकांनी विक्रेत्यांकडील अंडी जबरदस्तीने फोडल्याचे प्रकार घडले आहेत.
प्लास्टिकपासून अंडी तयार केली जात असल्याच्या अफवा मागील एक दोन वर्षांंपासून पसरत आहेत. वसई-विरार शहरात पुन्हा या अफवांचे लोण पसरले आहे. समाजमाध्यमांवरून नकली अंडी कशी तयार केली जातात, त्याच्या चित्रफिती पसरविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. विरार मधील नाना नानी पार्क, गुरुदत्त नगर, बोळींज, नालासोपारामधील आचोळे, समेळपाडा, वसई गिरिज या ठिकाणी नकली अंडी सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.
त्यामुळे आता नागरिक चक्क दुकानात जाऊन अंडी फोडून पाहत आहेत. विरारच्या नाना-नानी परिसरात चक्क लोकांनी अंडय़ाच्या दुकानात जाऊन अंडय़ाचे ट्रेच्या-ट्रेय फोडून अंडय़ाची तपासणी केली. यावेळी मोठा जमाव रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर जमावाने जबरदस्ती दुकान बंद करायला लावले. विरार पूर्वेच्या कारगिल नगर परिसरात जमावाने दुकानातील अंडी फोडून तपासणी केली. नालासोपारा पश्चिमेच्या समेळ पाडा परिसरात सायकल वर अंडी विकणाऱ्या एका विक्रेत्याला चक्क रस्त्यात असाहित्य संमेलनात डवून त्याच्याकडील अंडी फोडून तपसणी करण्यात आली. या संदर्भात नालासोपारा पोलीस ठाण्यात नकली अंडी असल्याचे सांगत त्याविरोधात तक्रारसुद्धा करण्यात आली आहे.
प्लास्टिकची अंडी असल्याचा अफवांचा रोष विक्रेत्यांना सहन करावा लागत आहे. समाजमाध्यमावरून चित्रफिती पसरविण्यात येत असल्याने नागरिकांचा संभ्रम वाढत आहे. पण अन्न व औषध विभागाने या संदर्भात सरळ प्लास्टिकची अंडी नसतात, प्लास्टिकची अंडी ही केवळ अफवा आहे. प्लॅस्टिकचं अंड तयार केलं जाऊ शकत नाही.
