चार दिवसांचा आठवडा भारतात लागू करा

फिनलँडच्या नवनिर्वाचित पंतप्रधान सना मरीन यांनी देशातील कामगार वर्गासाठी दिवसातील काम सहा तासांचे करावे. तसेच पाच दिवसांऐवजी चार दिवसांचा आठवडा करावा, असा प्रस्ताव मांडला. प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणीही लवकरच सुरू होणार आहे. ही बातमी समोर आल्यानंतर अनेक भारतीयांनी आपल्याला फिनलँडमध्ये स्थायिक होण्याची इच्छा असल्याचे सोशल नेटवर्किंगवर म्हटले. सना यांनी घेतलेल्या या निर्णयाची सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘टॅग’ करून फिनलँडच्या पंतप्रधानांच्या या निर्णयाचा एकदा अभ्यास करा, असा सल्लाही दिला आहेडाव्या आघाडीतील पाच पक्षांनी एकत्र येऊन फिनलँडमध्ये सरकार स्थापन केले आहे. मरीन यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी सर्वात आधी देशातील कामगार वर्गाचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने एक ठराव मांडला. देशातील सर्वच कंपन्यांनी कामगारांच्या कामाच्या वेळा कमी करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे मरीन यांनी स्पष्ट केले आहे. देशातील कामगारवर्गाने कामामध्ये किती तास घालवले पाहिजेत याबद्दल मला चिंता असल्याचे मरीन म्हणाल्या.

तुकरूमध्ये मरीन यांच्या सोशल डेमोक्रॅटीक पार्टीच्या (एसडीपी) १२०व्या वर्धापनादिनाच्या निमित्ताने या नवीन वेळापत्रकाची चाचपणी करण्याचे आदेशही मरीन यांनी दिले आहेत. ‘देशातील कामगार वर्गाचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे,’ असेही मरीन यांनी स्पष्ट केले.

सना यांच्या या निर्णयाची बातमी सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर भारतीयांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. फिनलँडला कसे शिफ्ट व्हायचे, असे अनेकांनी विचारले आहे. तर काहींनी या पोस्टवर ‘कमेंट’ करताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आहे.

कामगारांना स्वत:साठी, कुटुंबासाठी अधिक वेळ देता येईल
नवीन वेळापत्रकामुळे काय फरक पडेल याबद्दल बोलताना मरीन म्हणतात, आठवडय़ातील चार दिवस आणि दिवसाला सहा तासच कामगारांनी काम करणे अपेक्षित आहे. असे करणे का शक्य नाही, हे मला समजत नाही? आठ तास काम केलेच पाहिजे, असा काही नियम किंवा शाश्वत सत्य आहे का? लोकांना त्यांच्या कुटुंबाबरोबर अधिक वेळ एकत्र घालवता आला पाहिजे, या मताची मी आहे. लोकांनी त्यांच्या आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवावा. छंद जोपासावे आणि सांस्कृतिक कार्यक्रम वगैरेंसारख्या इतर अनेक गोष्टी आहेत, ज्या त्यांना या वेळात करता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *