पैशांची बॅग हिसकावण्यासाठी तीक्ष्ण हत्याराने वार

शहरातील जानाई फायनान्समध्ये काम करणाऱ्या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याच्याकडील १२ लाख रुपये असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न झाला. जमलेल्या लोकांनी हल्लेखोराच्या दिशेने दगडफेक केल्याने पैसे व तरुणाचे प्राण वाचले, पण हल्लेखोर पसार झाले.

गुरुवारी सकाळी १०च्या सुमारास वसंतराव नाईक चौकातून राजीव गांधी चौकाच्या दिशेने प्रदीप शिवाजी पाटील हे आपल्या दुचाकीवरून जात होते. त्यांच्याकडे पशाची बॅग होती. पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळील बॅग पळवण्याचा प्रयत्न केला. या वेळी झटापट झाली. प्रदीप पाटील यांनी बॅग पोटाला घट्ट धरून ठेवली, तेव्हा हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. त्यामुळे रक्तबंबाळ झाले तरी त्यांनी बॅग मात्र सोडली नाही.

जमलेले लोक या हाणामारीत हल्लेखोराच्या दिशेने दगडफेक करण्याचा प्रयत्न करत असताना हल्लेखोर लोकांनाही हत्याराची भीती दाखवत होते. मात्र, लोकांची संख्या वाढली व जमाव अंगावर चालून येत असल्याचे लक्षात येताच हल्लेखोर पसार झाले. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात प्रदीप पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *