उस्मानाबादच्या तामलवाडीमध्ये आईच्या मृतदेहाशेजारी सापडलेल्या चिमुकलीला तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या हत्याकांडाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या पथकाला पोलिस अधिक्षकांनी दहा हजार रुपये बक्षिस म्हणून दिले होते. पण पोलिसांनी ही रक्कम त्या चिमुकलीच्या नावावर एफडी करुन खाकी वर्दीतील अनोखं दर्शन घडवलं.
पैशाच्या वादातून नातेवाईकानेच या कलावती महंतु नावाच्या महिलेची हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झालं होती. तामलवाडीतील या अत्यंत क्रूर खुनाचा छडा पोलिसांनी दोनच दिवसात लावला. मृत महिलेचा नातेवाईक सिद्धराम खांडेकर याच्यात आणि महिलेमध्ये पैशाच्या देण्याघेण्यावरुन वाद झाला होता. हा वाद टोकाला पोहोचला आणि रागाच्या भरात त्याने महिलेचा खून केला, अशी कबुली सिद्धरामने पोलिसांना दिली. या ठिकाणी दीड वर्षांची मुलगी पोलिसांना सापडली होती. आईच्या मृतदेहाशेजारी ही चिमुकली रात्रभर रडत होती. ही त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक मिर्झा बेग यांनी चिमुकलीला सांभाळण्याची जबाबदारी त्यांचे सहकारी मायंदे या पोलिस कर्मचाऱ्यावर सोपवली होती.

