पूल उभारणीच्या कामात झालेल्या अवाजवी विलंबामुळे कळंबचा नवीन खाडीपूल चर्चेत असतानाच आता पुलाचे काम त्वरेने पूर्ण करण्यासाठी पुलालगतच्या तिवरांच्या झाडांची मोठय़ा प्रमाणात नासधूस करण्यात आली आहे. अडथळा ठरणाऱ्या तिवरांच्या झाडांवर मातीचा भराव करून रस्ता तयार करण्यात आला आहे.
निर्मळ-कळंब आणि पुढे राजोडी, अर्नाळ्याला जोडणाऱ्या या मुख्य रस्त्यावर निर्मळनजीक खाडीवर असलेला जुना पूल जीर्णावस्थेत आहे. हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने या पुलाशेजारी नवीन पूल बांधण्यासाठी घेतला आहे. या पुलाचे काम दीड वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित असताना चार वर्षांचा विलंब होऊनही अद्यपही हा पूल वाहतुकीकरिता तयार झालेला नाही. यामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. जुना पूल खिळखिळा झाला असून गैरसोयीचा ठरू लागला आहे. त्यामुळे नवीन पुलाचे बांधकाम लवकरात लवकर व्हावे, यासाठी जनमताचा रेटा वाढू लागला आहे.
पुलाचे बांधकाम झाल्यानंतर पुलाच्या कळंब आणि निर्मळ बाजूला जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्यासाठी या ठिकाणच्या तिवरांच्या झाडांची नासधूस करण्यात आली आहे. या तिवरांवर मातीचा बेकायदा भराव करून त्यावरून रस्ता तयार करण्यात आला आहे. ही तिवरतोड कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून केली याबाबतची निश्चित माहिती समोर आली नसली तरी याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या प्रकारासंबंधी सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अधिकारी पी. आर. चव्हाण यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. या प्रकारासंबंधी सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अधिकारी पी. आर. चव्हाण यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
खाडीपुलाची रखडपट्टी
कळंब खाडीवर नवीन पूल बांधण्याचे काम नवी मुंबईतील मे चैतन्य कन्स्ट्रक्शन या कंपनीला तीन कोटी ९८ लाख ७६ हजार रुपये इतक्या किमतीला दिले आहे. २७ फेब्रुवारी २०१४ रोजी कार्यारंभाचा आदेश दिल्यानंतर २७ ऑगस्ट २०१५ मध्ये म्हणजे १५ महिन्यांत कंपनीने काम पूर्ण करावयाचे होते. मात्र वेळेवर काम पूर्ण झाले नाही. या कालावधीत कामासाठी लागणारे साहित्य, मजूर इत्यादी उपलब्ध झाले नाही. तसेच पावसाळ्यात काम करणे शक्य झाले नाही, अशी कारणे ठेकेदाराने दिली होती. त्यानंतर ठेकेदार कंपनीला ३१ मे २०१६ पर्यंत म्हणजे आणखी नऊ महिने मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र आता, जानेवारी २०२० उजाडला तरी हा पूल जनतेच्या वापरासाठी खुला करण्यात आलेला नाही.
