मेट्रोचे सहा कोच पिंपरी चिंचवडमध्ये दाखल

पुणेकरांना प्रतिक्षा लागून राहिलेल्या मेट्रो ट्रेनचे डबे रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाले. अनेक पुणेकर मेट्रोचे डबे पाहण्यासाठी याठिकाणी आले होते. यावेळी कामगारांनी ढोलताशे वाजवून डब्यांचे स्वागत केले. मात्र, या सोहळ्याला राजकारणी आणि मेट्रो अधिकाऱ्यांमधील वादाचे गालबोट लागले. मेट्रो कोचच्या पूजनावरून पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगिरी आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे समजते.

दरम्यान, स्वारगेट ते पिंपरी या टप्प्यातील पिंपरी ते दापोडी मेट्रोमार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जून २०१७ मध्ये मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली होती. यानंतर अवघ्या ३० महिन्यांच्या कालावधीत बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मेट्रो प्रशासनाने पहिल्या टप्प्यांची मेट्रो सुरु करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी तीन डब्ब्यांची मेट्रो सुरु करण्यात येईल. यासाठी मेट्रोचे सहा कोच आज पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाले. मेट्रो ट्रेनमधून एकावेळी ९५० प्रवाशी प्रवास करु शकतील. मेट्रो ट्रेनचा कमाल वेग ९० किलोमीटर प्रतितास इतका असेल. तसेच मेट्रोत मोबाईल, लॅपटॉप चार्जिंगची सुविधा उपलब्ध असेल.

हे डबे स्टेनलेस स्टीलपासून तयार करण्यात आल्याने वजनाला हलके आहेत. यामध्ये अत्याधुनिक एलईडी दिवे, बाह्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार आतील दिवे आपोआप कमी-अधिक प्रकाशमान होण्याची यंत्रणाही असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *