हुंडा मागणं हा गुन्हा आहे. पण हुंडयाची कुप्रथा आजही आपल्या समाजात कायम आहे. हुंडयामुळे आजतागयत अनेक संसार उद्धवस्त झाले आहेत. ठरलेली लग्न मोडली आहेत. हुंडयासाठी आजही अनेक मुलींचा सासरी छळ होतो. प्रसंगी त्यांची हत्या सुद्धा केली जाते. महत्वाचं म्हणजे सुशिक्षित, उच्चभ्रु समाजात आजही हुंडा मागितला जातो. त्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. दिल्लीच्या कापाशेरा भागात हुंडयासाठी विवाहितेची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
नवऱ्याला अजिबात खंत नाही
आरोपी पतीचे नाव रोहित असून त्याला शुक्रवारी सकाळी हरणाया सोनीपतमधून अटक करण्यात आली. रोहित एका नातेवाईकाच्या घरी लपला होता. पोलीस निरीक्षक संतान सिंह रावत यांच्या नेतृत्वाखाली टीमने रोहितला अटक केली. आपल्या कृत्याबद्दल त्याला अजिबात पश्चाताप नाहीय. मुलीकडच्या मंडळींनी हुंडयाची मागणी पूर्ण केली नाही म्हणून पत्नीची हत्या केल्याचे त्याने सांगितले. रोहितला अटक करण्याआधी त्याचा मोठा भाऊ मोहित, त्याची आई सुरेश, मोहितची पत्नी मीनू यांना पोलिसांनी अटक केली.
साखरपुडयालाच मागितली होती SUV कार
रोहितचा चार वर्षांपूर्वी नऊ मार्च २०१५ रोजी विवाह झाला होता. साखरपुडयाच्यावेळीच दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी रोहितच्या कुटुंबाने पैसा आणि एसयूव्ही कार मागितली होती. लग्न झाल्यानंतरही दोघांमध्ये सतत भांडणे सुरु होती. रोहितची पत्नी दुसऱ्यांदा गर्भवती होती. या जोडप्याला दीड वर्षांचा मुलगा आहे. पहिले मुल झाल्यानंतरही रोहितच्या कुटुंबाने हुंडयासाठी तगादा लावला होता.
हत्येला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न
आरोपीसह त्याच्या कुटुंबाने हत्येला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला. इमारतीच्या गच्चीवरुन खाली पडल्यामुळे विवाहितेचा मृत्यू झाला असे आरोपीचे कुटुंब पोलिसांना पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. पण पोलिसांना त्यांची थिअरी पटत नव्हती. आरोपी रोहितने पत्नीच्या डोक्यात गोळी घालून तिची हत्या केली व नंतर तिचा मृतदेह गच्चीवरुन खाली फेकला होता. अखेर शवविच्छेदन अहवालातून सत्य समोर आलं. गोळी लागल्यामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचे स्पष्टपणे अहवालात नमूद करण्यात आले होते. गच्चीवरुन खाली फेकल्यामुळे कवटीमध्ये अनेक ठिकाणी फ्रॅक्चर होते. ही घटना घडली त्यावेळी मृत महिला दोन महिन्यांची गर्भवती होती. रोहितकडे त्याच्या वडिलांची परवानाधारक बंदुक होती. गुरगावमधल्या एका शाळेतील आयटी विभागात रोहित नोकरी करतो.