दिवसा लागणारे उन्हाचे चटके आणि रात्री जाणवणारा गारवा यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. या विषम वातावरणामुळे विषाणूजन्य आजारांचे प्रमाण शहरात वाढत आहे. तसेच अॅलर्जीसह श्वसनाचे विकारही गेल्या काही दिवसांमध्ये बळावले आहेत.
रात्रीचे घसरणारे तापमान आणि दिवसा चढणारा पारा यामुळे हवेतील विषाणूंचे प्रमाण वाढत असते. या वाढत्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे संसर्गजन्य आजारांच्या प्रमाणामध्येही वाढ होत असते. सध्या उपचाराकरिता येणारे बहुतांश रुग्ण हे वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या संसर्गाने बाधित आहेत, असे फॅमिली फिजिशियन डॉ. जयेश लेले यांनी सांगितले. घसा दुखणे, सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये गेल्या आठवडय़ापासून वाढ झाली आहे. बहुतांश रुग्ण हे घशाच्या संसर्गाची तक्रार घेऊन येत आहेत. तेव्हा घसादुखीचा त्रास होत असल्यास गुळण्या करणे हा फायदेशीर उपाय असल्याचे डॉ. लेले सांगतात.
पहाटे हवेत वाढलेल्या गारव्यामुळे दमा, ब्रॉन्कायटिस, अॅलर्जी असे श्वसनाचे आजारही मोठय़ा प्रमाणात बळावले आहेत. पूर्वी दिवसातून एखाद्या रुग्णाच्या छातीच्या कार्याची चाचणी करावी लागत होती. परंतु हवेतील बदलामुळे दिवसभरात जवळपास दहा रुग्णांची आता ही चाचणी करावी लागत आहे. तेव्हा या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत फुप्फुसरोगतज्ज्ञ डॉ. विकास ओसवाल यांनी व्यक्त केले आहे.
सकाळच्या हवेमध्ये धूरक्यांचे प्रमाण अधिक असल्याने यावेळेस शक्यतो व्यायाम किंवा चालण्यासाठी बाहेर पडणे टाळावे. जावे लागल्यास मास्कचा वापर करावा. अॅलर्जी किंवा दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी त्रास होत नसला तरीही नेहमीच्या डॉक्टरांकडून तपासणी करून औषधांबाबत सल्ला घ्यावा. प्रतिबंधात्मक म्हणून औषधांची मात्रा वाढविण्याची आवश्यकता भासू शकते, असेही पुढे डॉ. ओसवाल यांनी सांगितले.
