ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने नाट्य आणि सिनेसृष्टीची कधीही भरून न निघणारी हानी झाली असून आज एक नाट्यपर्व आणि नटसम्राट व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना विविध मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली.
मराठी रंगभूमीने लाडका नटसम्राट गमावला आहे. ‘झाले बहु, होतील बहु; पण या सम हाच’, या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. श्रीराम लागू यांना श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. लागू यांनी साकार केलेला ‘नटसम्राट’ अविस्मरणीय ठरला. डॉ. लागू यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटांत काम केले. पण ‘पिंजरा’ मधील ‘मास्तर’ आणि ‘सिंहासन’ मधील ‘मंत्री’ त्यांनी जबरदस्त पद्धतीने उभा केला. डॉ. लागू हे उत्तम वाचक, लेखक व विचारवंत होते. सामाजिक, राजकीय विषयांवर ते आपली मते ठामपणे मांडत राहिले. मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात त्यांचे योगदान मोठे होते. डॉ. लागू यांना महाराष्ट्राची जनता सदैव स्मरणात ठेवील, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.
वैचारिक भान असलेले प्रयोगशील रंगकर्मी म्हणून डॉ. लागूंचा मोठा प्रभाव कलाक्षेत्रावर राहीला. जुन्याजाणत्यांपासून ते होतकरू कलावंतापर्यंत सर्वांना त्यांचा आधार वाटायचा. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्या तर डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने आपण एका अत्यंत श्रेष्ठ अभिनेत्याला आणि पुरोगामी विचारांशी बांधिलकी असणाऱ्या व्यक्तीला मुकलो आहोत. डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा भावना राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या. मराठी रंगभूमीला आणि अभिनय क्षेत्राला उत्तुंग उंचीवर नेणारा कलाकार आज आपल्यातून निघून गेला आहे. या दिग्गज कलाकाराला आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो, अशा भावना राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केल्या.
ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. पिंजरा, सामना यांसारखे चित्रपट आणि नटसम्राट, हिमालयाची सावली यांसारख्या अजरामर नाटकांमधून त्यांनी मराठी चित्रपट-नाट्यसृष्टी जिवंत केली, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ. लागूंना श्रद्धांजली वाहिली.
