पावसामुळे धुळ्यात बाजार समितीतील कांदा, मक्याचे नुकसान

शहरात गुरुवारी दुपारी अचानक अर्धा तास  वादळी पाऊस पडल्याने सखल भागात पाणी साचले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेला कांदा आणि मका पावसामुळे  पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे शेतातील उभ्या कापसाचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळपासून ऊन असताना अचानक दुपारी वातावरणात बदल झाला. आकाशात ढग दिसू लागले. दुपारी दोनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु झाला. पावसामुळे धुळेकरांची एकच धावपळ उडाली. पावसामुळे जुन्या महापालिका चौकात, झाशीराणी कॉम्प्लेक्ससमोर आणि अन्य चौकांमध्ये डबकी तयार झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेला कांदा, मका, बाजरी भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. काहींनी मिळेल त्या कापडाने धान्य झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, जोरदार पावसामुळे धान्य ओले झाले. शिवाय, शेतात उभा असलेला कापूसही भिजला. याआधीच्या अवकाळी पावसाची भरपाई अजून शेतकऱ्यांना मिळालेली नसतांना आता गुरुवारी झालेल्या पावसात पिकांचे अधिक नुकसान झाले. आता या नुकसानीचे पंचनामे केव्हा होतील आणि मदत केव्हां मिळेल, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *