महापालिकेच्या मुलुंड येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील तरण तलावात क्लोरिन वायूची गळती झाली. अग्निशमन दलाच्या महिला कर्मचाऱ्यासह आठ जणांना बाधा झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली.
मुलुंड येथे महापालिकेचे प्रियदर्शनी क्रीडा संकुल आहे. या संकुलातील तरण तलावात बुधवारी संध्याकाळी क्लोरिन वायूची गळती झाली. तरण तलावाच्या शुद्धीकरण प्रकल्पाच्या इमारतीच्या तळमजल्यावर क्लोरिन गॅसचे सिलिंडर ठेवले होते. त्यातून अचानक गळती सुरू झाली. क्लोरिन गॅस सर्वत्र पसरण्यास सुरुवात झाली. याबाबत सूचना मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गॅसची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला. काही अग्निशमन कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना गॅसमुळं गुदमरल्यासारखं झालं. अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना तातडीनं जवळच्या पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी पी. एस. रहांगदळे यांनी दिली.
