मोबाइलमुळे शरद पोंक्षेनी थांबवला प्रयोग

नाट्यगृहात, चित्रपटगृहात मोबाइल ‘सायलेंट मोड’वर ठेवा किंवा बंद करा, असे प्रबोधन वारंवार केले जात असले, तरी प्रेक्षकांवर त्याचा शून्य परिणाम होत असल्याचे रविवारी पुन्हा अधोरेखित झाले. प्रेक्षकाच्या मोबाइलच्या रिंगमुळे आणि फोनवर बोलण्यामुळे ‘हिमालयाची सावली’ या नाटकाचा बालगंधर्व रंगमंदिरातील प्रयोग अभिनेते शरद पोंक्षे यांना रविवारी थांबवावा लागला. पोंक्षेंसह इतर कलाकारांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर आणि इतर प्रेक्षकांचा ओरडा खाल्ल्यानंतर संबंधित प्रेक्षक नाट्यगृहाबाहेर गेला. त्यानंतर प्रयोग सुरळीत झाला, तरी मोबाइलमुळे व्हायची ती शोभा झालीच!

‘हिमालयाची सावली’ या नाटकाचा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिरात रविवारी सायंकाळी पाच वाजता होता. नाटकाला प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती. नाटक ऐन रंगात आले असताना एका प्रेक्षकाच्या मोबाइलची रिंग सतत वाजू लागली. त्यापुढेही जाऊन संबंधित प्रेक्षक बसल्या जागेवरून बोलू लागल्यानंतर मोबाइलवर पलीकडून बोलणाऱ्याचाही आवाज स्पष्टपणे प्रेक्षकांना ऐकू येऊ लागल्याने नाटकाचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांचे आणि भूमिकेशी एकरूप झालेल्या कलाकारांचे लक्ष विचलित झाले. प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केलीच; पण नाटकातील महत्त्वाची संवादफेक करणार इतक्यातच हा व्यत्यय आल्याने पोंक्षे यांनीही मग प्रयोग थांबवला. संबंधित प्रेक्षकाला बाहेर काढा, अशी मागणी इतर प्रेक्षकांनी केल्याने संबंधित प्रेक्षक खजिल होऊन नाट्यगृहाबाहेर गेला.

नाट्यप्रयोगादरम्यान किंवा चित्रपटगृहात मोबाइल बंद ठेवण्याच्या सूचना सतत द्याव्या लागत असल्या, तरी प्रेक्षकांमध्ये सुधारणा होताना दिसत नसल्याचेच या प्रकारामुळे अधोरेखित झाले आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी नाट्यप्रयोग थांबवून किंवा इतर माध्यमांतून या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकाराला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबईतील नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिका हे धाडस दाखवणार का, असा सवाल केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *