मुंबईमध्ये पुन्हा एका हिट अॅण्ड रन प्रकरण समोर आले आहे. शुक्रवारी रात्री मद्यधुंद अवस्थेतील कार चालकाने तरूणीला उडवले. या धडकेत २३ वर्षीय अर्चना पारठे या तरूणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोषींवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी पवित्रा मयत तरूणीच्या कुटुंबीयांनी घेतली आहे.
शनिवारी सकाळपासूनच मयत तरूणीच्या नातेवाईकांनी चुनाभट्टी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या केला आहे. तर, या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असल्याचेही पोलीस सांगत आहेत. जो पर्यंत आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मुलीच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काही लोक मद्यधुंद अवस्थेतच एसंट कार घेऊन निघाले होते. पण, ड्रायव्हरचा तोल गेला आणि कार अनेक वाहनांना धडक देत फुटपाथवर चढली. त्याच वेळी धावजी केणी मार्गावरील साईबाबा मंदिरजवळील फुटपाथवर चालणाऱ्या तीन तरुणींपैकी अर्जना पराठे या तरुणीला कारने धडक दिली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
तरूणीला धडक दिल्यानंतर ही गाडी स्वदेशी मिल चाळ नंबर ११३ मध्ये घुसली. वाहन चालकांना चुनाभट्टी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, यामध्ये आणखी काही महिला जखमी झाल्या असून या महिलेला जवळील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना त्याब्यात घेतले आहे. याप्रकरणी गु.र.क्र. 315/19 कलम 304(2), 279, 34 भा.दं.वि. सह 184, 185,188, 134 (अ), (ब) मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
