बलात्काराचा आरोपी नित्यानंदनं स्थापला नवीन देश, हिंदूंना आवाहन…

बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला स्वयंघोषित बोगस बाबा नित्यानंद याने इक्वेडोर देशाजवळ एका बेटावर स्वतःचा देश स्थापन केल्याचं सांगितलं जातंय. या देशाला त्याने ‘कैलास’ असं नाव दिल्याचं समजतंय. हा भोंदूबाबा देशातून पळून गेलाय. त्याचा शोध सुरू आहे. नित्यानंदचं हे बेट कॅरेबियन बेट समुहात त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या जवळपास असल्याची माहिती आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यावर नित्यानंद नेपाळमार्गे देश सोडून पळाला होता. या देशाची नित्यानंदने वेबसाईटही तयार केलीय. ‘हिंदू धर्म ज्यांना आचरणात आणायचा आहे किंवा ज्यांना हिंदू व्हायचं आहे त्या सर्वांना या देशाचं नागरिकत्व मिळेल’ असं त्यानं म्हटलंय. विशेष म्हणजे या वेबसाईटच्या मते या कैलास देशात हिंदीला स्थान नाही. इंग्लिश, संस्कृत आणि तामिळ या अधिकृत भाषा असल्याचं म्हटलंय. कैलास देशाचा पासपोर्ट आणि ध्वजही त्याने तयार केल्याचं सांगण्यात येतंय. भारतातून फरार झालेल्या स्वयंभू बाबा नित्यानंदचा शोध सुरू आहे. गुजरात पोलिसांनी २२ नोव्हेंबर रोजी नित्यानंदच्या अहमदाबाद आश्रमाची झाडाझडती घेतली होती. परंतु, इथं त्यांच्या हाताला काहीही लागलं नाही. kailaasa.org या वेबसाईटवर त्यानं आपल्या कैलास या नवीन देशाबद्दल माहिती दिलीय. हा देश त्यांच्यासाठी आहे जे आपल्याच देशात हिंदू असण्याचा हरवलाय, असं त्यानं याबद्दल म्हटलंय. यासाठी त्यानं आपल्या देशातील पासपोर्टला ‘पारपत्रम’ असं नाव दिलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *