चिदंबरम येणार तिहारमधून बाहेर; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर दिलासा मिळाला आहे. याप्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयानं चिदंबरम यांना दोन लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. त्यामुळे चिदंबरम यांचा तिहार तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. अटक झाल्यापासून पी चिदंबरम जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन दिला आहे. आता ईडीच्या गुन्ह्यातही त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

बुधवारी सकाळी अकरा वाजता सर्वोच्च न्यायालयानं चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर निकाल दिला. दोन हमीदारांसह २ लाख रूपयांच्या बॉण्डवर न्यायालयानं त्यांचा जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती आर. बानुमती यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंठपीठानं हा निकाल दिला.

चिदंबरम यांना न्यायालयानं घातल्या अटी

चिदंबरम यांना जामीन देताना न्यायालयानं काही अटी घातल्या आहेत. तपास यंत्रणांना चौकशीला पूर्ण सहकार्य करावं लागेल. त्याचबरोबर परवानगीशिवाय देश सोडून जाता येणार नाही, या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही साक्षीदाराला संपर्क करू नये किंवा त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करण्यास न्यायालयानं मज्जाव केला आहे. तसेच या प्रकरणाबाबत सार्वजनिक मंचावर बोलू नये आणि माध्यमांनाही कुठलीही मुलाखत देऊ नये, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *