मुंबईच्या जवळच थांबा ! काँग्रेस आमदारांना पक्षश्रेष्ठींच्या सूचना

राज्यात शिवसेनेसह सरकार स्थापन होणार आहे, त्यामुळे सर्वानी मुंबईत किंवा मुंबईच्या जवळपासच थांबावे, अशा सूचना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस आमदारांना दिल्या आहेत.

राज्यात बिगर भाजप सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले जाणार आहे. त्यासाठी लवकरच राज्यपालांकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे सरकार स्थापनेचा दावा करतील. त्यादृष्टीने काँग्रेस आमदारांची शुक्रवारी बैठक झाली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष थोरात, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार, के.सी. पाडवी आदी नेते उपस्थित होते.

या वेळी शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस आमदारांच्या सह्य़ा घेण्यात आल्या. त्यानंतर झालेल्या एकत्रित बैठकीत सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे, कदाचित राज्यपालांना भेटण्यासाठी सर्व आमदारांना जावे लागेल, त्यामुळे फार दूर न जाता, मुंबई किंवा मुंबईच्या जवळपासच काही दिवस थांबावे, अशा सूचना थोरात यांनी आमदारांना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *