राज्यात सत्ता संघर्ष सुरू असताना आता भाजपाकडून आणखी एक घोषणा करण्यात आली आहे. मुंबई महापौर पदाच्या यंदाच्या निवडणुकीत भाजपा सहभाग घेणार नसल्याची माहिती भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिली आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना शेलार यांनी सांगितले की, पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजपा मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीत सहभाग घेणार नाही. शिवाय, कोणत्याही विरोधीपक्षाशी युती करण्याची देखील भाजपाची इच्छा नाही. याचबरोबर २०२२ मध्ये पक्षाकडे स्वतःचे संख्याबळ असेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.\
मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत. मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचारांच्या जीवावर आम्ही आता अभद्र युती करणार नाही.. मात्र २०२२ चा मुंबईचा महापौर स्वबळावर आणि संख्याबळावरही” असं आशिष शेलार यांनी ट्विट केलं आहे.मुख्यमंत्रीपद व सत्तेतील समान वाटा या मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेची युती तुटली आहे. एवढेच नाहीत शिवसेनेने एनडीएलाही सोडचिठ्ठी देत, सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघडीबरोबर जाऊन महाशिवआघाडीचे सरकार आणण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहे. या सर्व घडामोडींचा आता राज्यातील स्थानिक निवडणुकांवर देखील परिणाम होणार असल्याचे दिसत आहे.
