संजय राऊतांची विचारपूस करण्यासाठी सर्व पक्षीय नेते लिलावती रुग्णालयात

राऊतांची विचारपूस करण्यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी लिलावती रुग्णालय गाठलं आहे. संजय राऊतांना सोमवारी अस्वस्थ वाटल्याने लिलावती रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यानंतर रात्री उशीरा त्यांच्यावर अँन्जिओप्लास्टीही झाली. त्यामुळे आज सकाळपासून राऊतांची भेट घेण्यासाठी दिग्गजांनी हजेरी लावली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे नातू रोहित पवार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राऊतांची लिलावतीत भेट घेऊन विचारपूस केली.

काँग्रेसमधून भाजपत गेलेले हर्षवर्धन पाटीलांनीही राऊतांची विचारपूस करण्यासाठी लिलावती रुग्णालय गाठलं. युती तुटली असली, सत्तेचा पेच कायम असला तरी जवळपास सर्वच पक्षांचे नेते लिलावतीमध्ये दिसत आहेत. मग त्यात भाजपही मागे नाही. संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरेंच नाही तर भाजपचे आशिष शेलारही पोहोचले.

लिलावतीमध्ये जाऊन शेलारांनी राऊतांची चौकशी केली. पण या भेटीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली असेल का असाही प्रश्न आहेच. जाता जाता प्रकृतीची काळजी घ्या आणि कमी बोला असा सल्लाही शेलारांनी, संजय राऊतांना दिला आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही राऊतांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *