आरोपी परिसरातच घुटमळत होता?

भांडुपच्या सोनापूर भागात गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिची हत्या करणारा आरोपी नंतरच्या काही दिवसांतही त्या परिसरात आपली ओळख लपवून घुटमळत होता, असे समोर आले आहे. या गुन्ह्यानंतर परिसरातील काही सतर्क रहिवाशांनीही आरोपीचा शोध सुरू ठेवला होता. हा तरुण नजरेस पडल्यानंतर रहिवाशांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

५ नोव्हेंबरला सोनापूर भागात १० वर्षांची गतिमंद मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासाच्या वेळी एक तरुण त्या मुलीला नेताना आढळला. त्यानंतर त्या मुलीचा मृतदेह ९ नोव्हेंबर रोजी विद्याविहार येथील रेल्वेरुळांवर आढळला. शवचिकित्सा केल्यानंतर त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. या प्रकरणी तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधील चित्रण सर्वदूर पसरवले होते. पीडित मुलीच्या नातेवाईकांनीही मुलीचा व संशयित तरुणाचा शोध सुरू ठेवला होता. ८ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास संशयित तरुणाशी साधर्म्य असलेला आणि तोंडावर फडका बांधलेला तरुण दिसतात काही रहिवाशांनी त्याला हटकले. तरुण पळू लागताच रहिवाशांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, हा आरोपी तरुण वडाळा येथील झोपडपट्टीत राहतो आणि मजुरीनिमित्त सोनापूर परिसरात येत असतो. त्यामुळे तो या परिसरातच आपले लक्ष्य हेरायचा, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *