दौंड—मनमाड रेल्वेमार्गावरील रेल्वे रूळ विळदनजीक तुटल्यामुळे भुसावळ—पुणे या रेल्वे गाडीला होणारा अपघात रामदास बापुराव थोरात (वय ४५, रा. विळद, ता. नगर) या शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे टळला आहे. विचित्र तापमानामुळे रूळाला तडे गेले होते. त्यामागे घातपाताचा प्रकार नव्हता, असा खुलासा मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने केला आहे. सतर्कता दाखविणारे थोरात यांना रेल्वे बक्षीसही देणार आहे.
विळद गावातील पाण्याच्या टाकीजवळ रामदास बापुराव थोरात हे शेतकरी राहतात. गावातून दौंड—मनमाड रेल्वे मार्ग जातो. ते रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रेल्वे रूळ ओलांडून जात असताना त्यांना (किलोमीटर नं. ३६९/३.०२) या ठिकाणी रूळाला तडे गेल्याचे दिसून आले. रूळाची पहाणी करीत बाबुलाल चावीवाला हा कर्मचारी चालला होता. मात्र, त्याला रूळाला तडे गेल्याचे दिसले नाही. त्याचवेळी नगरकडे भुसावळ—पुणे ही एक्स्प्रेस रेल्वे चालली होती. तडे गेलेल्या रूळावरून रेल्वे गेली तर मोठा अपघात होईल, असा विचार त्यांच्या डोक्यात आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता धावती रेल्वे थांबविण्यासाठी प्रयत्न केले.
आपल्या जिवाची परवा न करता त्यांनी अंगातील लाल रंगाचे बनियन काढून गाडीच्या दिशेने हातात लाल बनियन फडकवत धाव घेतली. कशाचीही तमा न बाळगता ते वेगाने धावत सुटले. पळताना दम लागला तरी ते थांबले नाहीत, सारखे पळतच होते. थोरात हे लाल कापड फडकावत असून त्यांचा गाडीचा थांबविण्याचा प्रय असल्याचे रेल्वे चालकाच्या लक्षात आले. चालकाने तातडीने ब्रेक लावून गाडी थांबविली. थोरात यांनी त्यांना पुढे रेल्वेचा रूळाला तडे गेल्याचे सांगितले. चालकाने व इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी याची खातजमा केली. तसेच झालेली घटना वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी काही वेळात येऊन तात्पुरता रेल्वे रूळ दुरूस्त केला. त्यानंतर ही रेल्वे गाडी पुढे गेली. गाडी गेल्यानंतर सुमारे चार तास रेल्वे कर्मचाऱ्यांनी रूळाच्या दुरुस्तीचे काम केले.

भुसावळ—पुणे (R. ११०२५) ही रेल्वे मनमाड—कल्याणमार्गे पुण्याला जाते. परंतु, सध्या या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे रेल्वे दौंड मार्गे वळविण्यात आली आहे. प्रवाशांचे प्राण वाचविल्याबद्दल शेतकरी थोरात यांचा प्रवाशांच्या वतीने तसेच रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान, रामदास थोरात यांच्यामुळे रेल्वे अपघात टळला. त्यांचा गावकऱ्यांना अभिमान असल्याचे प्रा. उत्तम लांडगे यांनी सांगितले.
चार हजाराचे बक्षीस
रामदास थोरात यांच्या सतर्कतेमुळे रेल्वे अपघात टळला. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक हितेश मल्होत्रा यांनी त्यांना चार हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली. उद्या सोमवार, दि. ११ रोजी नगर येथे थोरात यांचा रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सत्कार करून बक्षीस देणार आहेत.
तापमानातील बदलामुळे रूळाला तडे
सध्या प्रखर ऊन व थंडी आहे. विचित्र हवामानामुळे रूळाला अचानक तडे जातात. अशी घटना होते त्यामागे घातपात नाही किंवा कोणाचा खोडसाळपणा नाही. तांत्रिक कारणामुळे रूळाला तडे गेले. या प्रकरणात रेल्वे कर्मचाऱ्यांचाही दोष नाही. त्यामुळे चौकशी होणार नसल्याचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी सांगितले.
