गुडविन ज्वेलर्सच्या ठाणे आणि डोंबिवली शहरातील शाखेत ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने घेतलेल्या झडतीत हाती काहीच लागले नसल्याने गुडविन ज्वेलर्सची ही फसवणूक पूर्वनियोजित असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तसेच तपासातही हाती काहीच लागत नसल्याने या प्रकरणात आता मुंबई पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
भिशी आणि जादा व्याजदराचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक गुडविन ज्वेलर्सचे मालक सुधीरकुमार आणि सुनीलकुमार या दोघांनी केली आहे.
या प्रकरणात डोंबिवली येथील रामनगर, ठाण्यातील नौपाडा आणि अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानुसार या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते, तर फसवणुकीची रक्कम कोट्यवधीच्या घरात गेल्याने या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. आठवड्याभरापासून सुरू असलेल्या या तपासात पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही. काही दिवसांपूर्वीच ठाणे आणि डोंबिवली शाखेत तपासणी केली होती. त्यावेळी ही दोन्ही दुकाने रिकामी होती. दोन्ही दुकांनांतील साहित्य सुधीरकुमार आणि सुनीलकुमार घेऊन गेले होते. तर डोंबिवलीतील पलावा भागातील त्यांच्या घरात पोलिसांनी झडती घेतली होती. यावेळी पोलिसांना केवळ संगणक हाती लागले होते.
मुंबई आणि ठाणे जिल्ह्य़ातील विविध शहरांमध्ये सुनीलकुमार अकराकरण, सुधीरकुमार अकराकरण यांनी गुडविन ज्वेलर्सची दुकाने सुरू केली होती. या दुकानांच्या माध्यमातून त्यांनी विविध योजना सुरू केल्या होत्या. एका वर्षांच्या ठेवीवर १६ टक्के व्याज, दोन वर्षांच्या ठेवीवर १८ टक्के व्याज तर पाच वर्षांच्या ठेवीवर दामदुप्पट तसेच एक वर्षे भिशी भरली तर पुढील एका महिन्याचे पैसे गुडविन ज्वेलर्स भरणार आणि त्यानंतर दागिने किंवा १३ महिन्यांचे पैसे दिले जातील. त्याचप्रमाणे दोन वर्षे भिशी भरली तर पुढील चार महिन्यांचे पैसे गुडविन ज्वेलर्स भरेल, अशा स्वरूपाच्या या योजना होत्या. या योजनांच्या आमिषांना बळी पडून शेकडो गुंतवणूकदारांनी त्यात पैसे गुंतविले होते. आठ दिवसांपूर्वी शहरातील गुडविन ज्वेलर्सची दुकाने बंद करण्यात आली. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर ही दुकाने बंद असल्यामुळे गुंतवणूकदारांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. त्या वेळेस दोघे मालक दुकाने बंद करून फरार झाल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. दरम्यान, आपल्याकडून ५० कोटींची खंडणी मागितल्यामुळे सुरक्षित ठिकाणी स्थळी असल्याचे गुडविन ज्वेलर्सच्या मालकांनी स्पष्ट केले आहे. तसंच ग्राहकांचे पैसे परत करण्याचा शब्दही त्यांच्याकडून देण्यात आला होता.
