६० लाख लुटले, जाता जाता चोरांनी आरशावर ‘भाभी जी बहुत अच्छी हैं’ लिहिले

बिहारची राजधानी असणाऱ्या पाटण्यामध्ये चोरांनी ६० लाखांचा डल्ला मारला आहे. येथील पत्रकार नगर परिसरातील हनुमान नगरमध्ये चोरांनी हा मोठा हात मारला आहे. विशेष म्हणजे चोरी करताना चोरांनी घरातील सर्व सदस्यांना एका खोलीमध्ये कोंडून ठेवले होते. चोरी करुन झाल्यानंतर घरातून निघताना चोरांनी घरातील आरशावर “भाभी जी बहुत अच्छी हैं” असंही लिहिल्याचं घरच्यांना अढळलं.

चोरांनी घरातील रोख रक्कम, दागिने आणि महागड्या वस्तू चोरल्या. स्थानिक पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिल्यानंतर तातडीने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत चोर पसार झाले होते. घरातील व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार एकूण पाच ते सहा जणांनी ही चोरी केली. हे सर्व चोर बराच वेळ घरामधील मौल्यवान वस्तू शोधत होते. घरातील बेडरुममधील ड्रेसिंग टेबलच्या आरशावर त्यांनी “भाभी जी बहुत अच्छी हैं” असं लिहिण्याबरोबरच त्यांनी अश्लील भाषेतील काही मजकूरही लिहिला होता. लिपस्टीकने आरशावर हा मजकूर लिहिण्यात आला होता.

या प्रकरणामध्ये पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. ज्या ठिकाणी चोरी झाली त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासून पाहत आहेत. ही घटना समोर आल्यानंतर पाटण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशाप्रकारे भरदिवसा चोरीची घटना घडल्याची पाटण्यातील ही पहिलीच वेळ नाही.काही दिवसांपूर्वीच येथील न्यू पाटलीपूत्र परिसरामध्ये एका बांधकाम व्यवसायिकाच्या ऑफिसमध्येही चोरीची घटना घडली होती. चोरांनी ऑफिसमधील लाखो रुपयांची रोख रक्कम घेऊन पळ काढला होता. विशेष म्हणजे बांधकाम व्यवसायिकाच्या ऑफिसमधील फिश टँकमधील मासेही या चोरांनी पळवल्याचे नंतर लक्षात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *