तालुक्यातील सावा शिवारात एका झुडपामध्ये वाघ आल्याचा निरोप मिळाला अन् वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी धावले. मात्र, पथक पोहोचताच झुडपातून कुत्रे समोर आले. या प्रकारामुळे वन विभागाच्या पथकाची स्थिती मात्र हसावे की रडावे, अशी झाली. रविवारी दुपारी एक वाजता हा प्रकार घडला.
सेनगाव व हिंगोली तालुक्यात वाघाने बस्तान मांडल्यानंतर प्रत्येकजण भयभीत झाला आहे. शेतात मजूर कामाला जाईनात तर गावकरी देखील एकटय़ाने गावाबाहेर निघत नसल्याचे चित्र आहे.
या वाघावर लक्ष ठेवण्यासाठी विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, जयसिंग कच्छवे, शेख जमील यांचे पथक दिवसरात्र गस्तीवर आहे. या शिवाय जिल्ह्य़ातील इतर परिक्षेत्रातील पथकेदेखील या भागात गस्तीवर ठेवण्यात आली आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सावा शिवारातील रेल्वे फाटकाच्या जवळ असलेल्या झुडपात वाघ आल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला देण्यात आली. त्यामुळे सेनगाव तालुक्यात गस्तीवर असलेले पथक काही वेळातच िहगोली तालुक्यातील सावा शिवारात दाखल झाले. या पथकाच्या वाहनाच्या आवाज ऐकल्यानंतर झुडपातून कुत्रे बाहेर निघाले. निरोप वाघ आल्याचा मिळाला अन् झुडपातून निघाले कुत्रे. यामुळे वन विभागाच्या पथकाची स्थिती हसावे की रडावे अशी झाली होती.
