ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचे निधन

ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचे आज (गुरूवारी) वृद्धपकाळाने निधन झाले आहे. त्या ८६ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि सूना असा परिवार आहे.  त्यांच्यानावावर १०० पेक्षा अधिक पुस्तकं आहेत. याशिवाय त्यांनी कथा,कांदबरी, प्रवासवर्णन याचबरोबर बालसाहित्यात मोलाचे काम केले आहे.

काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. आज सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी वांद्रे येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया साहित्य जगतातून व्यक्त होत आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना मसापचा ह. ना. आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालयाच्या कमलाबाई टिळक पुरस्कार, अभिरुची पुरस्कार आणि मुंबईचा श्री अक्षरधन स्त्री  साहित्यिका पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.

किर्लोस्कर, प्रपंच, ललना इत्यादी मासिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. शिवाय त्यांनी विविध वाङ्मयप्रकारांत लेखन देखील केले आहे. १९६८ ते १९७८ या काळात अनुराधा मासिकाची सहाय्यक संपादिका म्हणूनही त्यांनी काम केले होते. गिरिजाघर, देवकुमार, चांदण्याचं झाड, चंद्रलिंपी, चक्रवेध, स्वप्नात चंद्र ज्याच्या, आभाळमाया, आत्मभान, झपाटलेला इ. गिरिजाबाईंच्या कादंबऱ्याही लोकप्रिय आहेत. गाभाऱ्यातील माणसं, जगावेगळी माणसं, कलावंत, साहित्य सहवास ही त्यांची व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *