केंद्र सरकारने दहा सरकारी बँकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरुद्ध बँक अधिकाऱ्यांनी येत्या २६ आणि २७ सप्टेंबरला संप पुकारला असून, त्याच्या पुढच्या दिवशी चौथा शनिवार (२८ सप्टेंबर), रविवार (२९ सप्टेंबर) असे सुटीचे दिवस आहेत. तर सोमवार व मंगळवार (३० सप्टेंबर, १ ऑक्टोबर) असे दोन दिवस बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यानंतर लगेच २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त बँकांना सुटी राहील. संप आणि सुट्या मिळून आठवडाभर बँका बंद राहणार आहेत. तेव्हा महिन्याअखेरीस बँकेशी संबंधित कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण व्यवहार करायचे असल्यास ते २५ सप्टेंबरपर्यंत केल्यास खातेधारकांना होणारा मन:स्ताप वाचू शकेल.
अघोषित संपावर जाण्याचे संकेत
संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यातही बँक कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे. कामाचा आठवडा सहाऐवजी पाच दिवसांचा करावा, ही प्रमुख मागणी असून बँक कर्मचारी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अनिश्चित कालासाठी संपावर जाऊ शकतात. सध्या बँक कर्मचाऱ्यांना एका आठवड्यात पाच तर एका आठवड्यात सहा दिवस काम करावे लागत आहे. या संपात केवळ सरकारी बँकांतील कर्मचारी सहभागी होणार आहेत. परंतु, खासगी बँका सुरू राहणार आहेत.
संघटनांच्या मागण्या
– बँकांचे विलीनीकरण होऊ नये
– पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा
– रोख व्यवहारांसाठीची वेळ कमी करावी
– आरबीआयच्या नियमानुसार निवृत्तीवेतन द्यावे
– बँकांमध्ये नोकरभरती करावी
– एनपीएस रद्द करावा
– ग्राहकांसाठीच्या सेवाशुल्कात कपात करावी
– वेतन आणि पगारात बदल करावे
