पुण्यात रोजगार झाला उणा; इंजिनिअर लावतोय पानाला चुना

शिक्षणाच्या माहेरघराबरोबरच ऑटो हब अशी पुण्याची दुसरी ओळख. पण अर्थव्यवस्थेसमोर आलेल्या आर्थिक अरिष्टाचा पुण्याच्या ‘ऑटो हब’लाही तडाखा बसला आहे. ऑटो हबमधील कंपन्यांनी रोजगार कपातीला सुरूवात केल्याने अनेक तरूणांची नोकरी गेली. त्यामुळे अनेकजण दुसरा रोजगार शोधत आहेत. तर बी.टेक. झालेल्या एका इंजिनिअरवर चक्क पानाला चुना लावण्याची वेळ आली आहे.

गेल्या दहा महिन्यांपासून वाहनांची विक्री घसरत चालली आहे. ऑगस्टमध्ये तर विक्रीच्या नीचांकाने ऐतिहासिक विक्रम नोंदवला. या अरिष्टाला सामोर जाण्यासाठी वाहन उद्योगाने रोजगार कपातीचे धोरण स्वीकारले आहे. पुण्याच्या ऑटो हबमध्येही कामगार कपात करण्यात आली असून, अनेक इंजिनिअर्सवर (अभियंता) बेरोगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे रोजगार गेलेले तरुण मिळेल ते काम करू लागले आहेत. पुण्यातील भोसरी परिसरात राहणाऱ्या शाहरूख शेख यांचं बी.टेक. झालेलं आहे. तो बी.टेक. इंजिनिअर ऑटोमोबाईल या कंपनीत कामाला होता. दोन महिन्यांपूर्वी शाहरुखची नोकरी गेली.

कंपनीने कराराचे (काँट्रॅक्ट) नुतनीकरण न करता शाहरूखला कामावरून कमी केले. इंजिनिअर असलेला शाहरूख क्षणात बेरोजगार झाला. त्यानंतर त्याने ६० पेक्षा अधिक कंपन्यांमध्ये रिझ्युम दिला. पण शाहरूखला दुसरी नोकरी मिळालीच नाही. त्यानंतर भोसरीच्या मार्केटमध्ये पानटपरी सुरू केली. ऑटो हबला बसलेल्या मंदीच्या फेऱ्यामुळे इंजिनिअर असेलल्या शाहरूखला पानाला चुना लावावा लागत आहे.

परिस्थिती काय?

भारतीय वाहन निर्मिती क्षेत्रात सध्या ३.७० कोटी रोजगार आहेत. मात्र गेल्या काही सलग विक्री घसरणीमुळे कंपन्यांनी वाहन उत्पादनही कमी केले आहे. अनेक कंपन्यांनी त्यांची विक्री दालने संख्याही आखडती घेतली आहेत. भारत-४सारखी प्रदुषणविषयक मानक अंमलबजावणी, इंधनाचे चढे दर, चलनातील अस्थिरता, रोकड चणचण आदी आव्हानेही या व्यवसायापुढे आहेत. कमी मागणीमुळे वाहन निर्मितीत कपात करावी लागल्याने या क्षेत्राला १५,००० रोजगार कपात करावी लागली आहे. तर देशभरातील ३०० वाहन विक्री दालने गेल्या काही महिन्यांमध्ये बंद झाली असल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *