अपघात झाल्यास शासन प्रतिखड्डा ५००० रुपये देणार का?

नवीन मोटार वाहन कायद्यान्वये शासनाने दंडाच्या रकमेत भरमसाठ वाढ केली आहे. मात्र, रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे होत असलेल्या अपघाताला कारणीभूत हे खड्डे आहेत. खड्डय़ांमुळे अपघात झाल्यास प्रतिखड्डा शासन वाहन चालकाला पाच हजार रुपये देणार का, असा मार्मिक प्रश्न विचारणारा संदेश समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. त्याला लोकांनी हातोहात उचलून धरले आहे.

चंद्रपुरातील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे आहेत. त्यामुळे लोकांना अपघातात जीव गमवावा लागतो. खड्डय़ांमुळे मणक्यांचे  आजार होत आहेत. अशा स्थितीत अ‍ॅड. आशीष धर्मपुरीवार या स्वयंसेवकाने सामान्य चंद्रपूरकरांचा आवाज समाजमाध्यमावर बुलंद केला आहे.  त्यांनी समाजमाध्यमांवर राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत. मी शासनाच्या धोरणा विरुद्ध नाही, पण जनसामान्य म्हणून समाज माध्यमातून मी माझी व्यथा मांडतोय. रात्री १२ पासून नवीन मोटार वाहन कायदा संपूर्ण देशात लागू झाला आहे. प्रत्येक नागरिकाने नियमांचे पालन केलेच पाहिजे. हे बरोबर. पण, एक प्रश्न की अपघात फक्त नियमांचे पालन न केल्यामुळेच होतो की रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमुळेही होतो. जर विनापरवाना वाहन चालवणे हा गुन्हा असून त्यासाठी ५००० हजार रुपये दंड आहे, तर रस्त्यावर खड्डे असतील तर प्रति खड्डा ५००० हजार रुपये शासन वाहन चालकाला देईल का?, महापालिका मालमत्ता करामध्ये सूट देईल का?, शासन खड्डय़ामुळे झालेल्या आजारांचा वैद्यकीय खर्च देईल का?, आम्हा चंद्रपूरकरांची सरकारकडे एकच मागणी आणि ती म्हणजे शासनाने पाहिले रस्ते चांगले ते पण खड्डे विरहित करावे आणि मग कर अथवा दंड  वसूल करावा.

महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्त्यांवरील खड्डय़ांकडे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी पंधरवडय़ापूर्वी रस्ते दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्या निर्देशांचे संबंधित विभाग प्रमुखांनी पालन केले काय हे बघण्याची गरज आहे. असे म्हणणे समाजमाध्यमातील संदेशातून मांडण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *